उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान व हाल झाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे उभी पिकं वाहून गेली,आणि जे राहिलं ते शेतातच कुजल ,पिकं मातीमोल झाली आणि आर्थिक संकटाच्या खाईत शेतकरी लोटला गेला,या खाईतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्याला मदतीचा हात देवून त्याला खाईतून बाहेर काढण्याची त्याला आधार देण्याची आवश्यकता होती ,सरकारने मदत जाहीर केली शेतीचे पंचनामे ही अधिकाऱ्यांनी केले दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल असे सरकारने जाहीर केले परंतु दिवाळी संपत आली तरी खात्यात शून्यच . कांद्याला दर नसल्याने शेतकऱ्याने साठवून ठेवला होता. आज नाही तर उद्या दर मिळेल या आशेने कांदा साठवला परंतु त्याची आशा धुळीत मिळाली
कांदा केवळ एक पीक नाही, तर शेतकऱ्याच्या घराचं आधारस्तंभ आहे.
शेतकऱ्याने दिवस-रात्र मेहनत करून कांदा उगवला, परंतु यंदाच्या अतिवृष्टीमुळे वातावरण दमट आणि आर्द्र झालं.
साठवलेला कांदा सडला आणि शेतकऱ्याची मेहनत, त्याचा विश्वास, वाया गेला.
हा तोटा फक्त आर्थिक नाही, तर शेतकऱ्याच्या आत्मसन्मानावरही घाव आहे.
गोदामात ओलसर वातावरण, दमट हवेचे प्रमाण वाढल्यामुळे कांदा सडला, कुजला आणि विकायला अमान्य झाला.
शेतकऱ्यांनी आशेने साठवलेला हजारो क्विंटल कांदा आता उकिरड्यावर टाकावा लागला.कांद्याचा खात झाला.हातात आलेल्या पिकाची माती झाली या स्थितीमुळे शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी लागणारे बियाणे, खत किंवा कीटकनाशक खरेदीसाठीही आर्थिक तंगी भेडसावत आहे.
एकीकडे नैसर्गिक आपत्ती, तर दुसरीकडे बाजारभावाची अस्थिरता शेतकरी दोन्ही संकटांना सामोरं जातो आहे .
कांद्याचा दर गेल्या काही महिन्यांत खाली सरकला आहे. निर्यातबंदी, व्यापाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे बाजारात भाव कोसळले.
साठवलेला कांदा विकला तरी तोटा, आणि ठेवला तरी नुकसान.इकडे आड तिकडे विहीर ,अशी अवस्था शेतकऱ्याची झाली आहे
शेतकऱ्याने गोदामासाठी खर्च केला , वीज ,सारंगी कामगार, वाहतूक — पण आता तो खर्चही परत मिळत नाही.
दर कमी, उत्पादन वाया, मेहनत मातीमोल या त्रासदायक चक्रात शेतकरी अडकला आहे त्याची परिस्थिती हतबल आहे.
शासनाने या समस्येवर त्वरित उपाय योजना केली असती तर तोटा टाळता आला असता.
निर्यातबंदीच्या निर्णयासोबत तातडीची खरेदी योजना, गोदामातील हवामान नियंत्रण आणि हमीभाव योजना राबवली असती तर शेकडो टन कांदा वाया गेला नसता.
सध्या प्रशासनाची उदासीनता शेतकऱ्याच्या दु:खात आणखीनच भर घालत आहे.
शासनाने फक्त पंचनामे आणि बैठकींचा “दिखावा” करू नये तर प्रत्यक्ष मदत खात्यात पोहोचवावी.
शेतकरी म्हणतो, “दर मिळेल म्हणून कांदा साठवला, पण आता कांदा सडला, आशा संपली आणि कर्जाचं ओझं वाढलं.”
ही वाक्यं फक्त तक्रार नाहीत, तर शेतकऱ्याच्या आयुष्याचा सत्यचित्र आहे.
कांदा उकिरड्यावर टाकल्यावर त्याची मेहनत, घाम आणि स्वप्नं सगळं कोसळतं.
सिंचन, खत, बी-बियाणं,मजूर, या सर्व खर्चांवर मेहनत करूनही तो रिकाम्या हाताने उभा राहतो.
शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे; त्याला फक्त आर्थिक मदत नाही, तर विश्वास, आधार आणि त्वरित कार्यवाही हवी आहे.दमट हवामान आणि अतिवृष्टीमुळे साठवलेला कांदा सडला, आणि तो उकिरड्यावर टाकला ही स्थिती लाजिरवाणी आहे.
सरकारने तातडीच्या खरेदी केंद्रांची व्यवस्था,योग्य हमीभाव दिला पाहिजे,निर्यात बंदी उठवली तर नक्कीच शेतकऱ्याला म्हणजेच बुडत्याला काडीचा आधार मिळेल. देशात एखाद्या पिकाचे
उत्पादन कमी झाले की लगेच परदेशातून आयात केली जाते व शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा केला जातो. तसे उत्पादन जास्त झाले तर परदेशात निर्यात करून शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम देवून न्याय का दिला जात नाही ?असा सवाल उद्ध्वस्त शेतकरी सरकारला विचारत आहे.
शेतकऱ्याच्या मेहनतीला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा प्रत्येक उकिरड्यावर पडलेला “साठवलेला कांदा त्याच्या दुर्दैवी जीवनाची साक्ष देत राहील . दर मिळेल या आशेने कांदा साठवला पण आता तो सडला,स्वप्नांचा चिखल झाला आशा संपली आणि कर्जाच ओझं अजून वाढलं .पाऊस कहर करून गेला आणि गेला तरी दुःखाचे आभाळ शेतकऱ्यावर कोसळत आहे दुर्दैवी शेतकऱ्याच्या डोळ्यात साठलेला महापूर ओसरणार की नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रिकाम्या हाताने , न्यायाच्या प्रतीक्षेत उभा आहे !”
आणि ही तक्रार नाही तर कृषी प्रधान देशातील शेतकऱ्याचे दुःखद आणि वेदनादायी सत्यचित्र आहे.
नूरजहाँ फकृद्दिन शेख
गणेशगाव




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा