सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
केंद्र सरकारने इथेनॉलचे आगामी हंगामासाठी १०५० कोटी लिटरचे टेंडर काढले असून त्यामध्ये तब्बल ६५० कोटी लिटर इथेनॉल कोटा हा साखर उद्योगासाठी दिला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या मागणीनुसार मागील वर्षाच्या तुलनेत साखर उद्योगासाठी ८ टक्क्याने इथेनॉलचा कोटा चालू होणाऱ्या हंगामासाठी वाढविण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे व्यक्त केली.
केंद्र सरकारने आगामी काळामध्ये इथेनॉलचे भाव वाढवणे गरजेचे आहे. इथेनॉलचे भाव वाढल्यास त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निश्चित होईल. इथेनॉल तसेच साखरेच्या एमएसपीच्या भाववाढीची मागणीही राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आली असून यासंदर्भात केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, सध्या शेतकरी ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर करू लागला आहे. ऊस पिक हे शाश्वत नगदी पीक असल्याने व नैसर्गिक आपत्तीत तग धरणारे पीक असल्याने देशात व राज्यामध्ये ऊसाच्या लागवड क्षेत्रात पुढील वर्षी निश्चितपणे वाढ होणार आहे. आगामी गळीत हंगामामध्ये महाराष्ट्रातील ऊस क्षेत्र वाढल्याने देशामध्ये साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्य अग्रभागी राहील, त्यानंतर उत्तर प्रदेश राज्य अग्रेसर असेल, असा अंदाज यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
चालू वर्षी राज्यात १२.५० लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली असून त्यातून सुमारे ११० ते ११५ लाख मे. टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा साधारण २५ ते ३० लाख मे. टनाने जास्त निर्माण होणार आहे. देशामध्ये सुमारे ३५० लाख मे. टन साखर उत्पादन होईल असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, इस्मा यांनी केंद्र सरकारला दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आगामी हंगामामध्ये सुमारे २५ ते ३० मे. टन जादा उत्पादित होणाऱ्या साखरेची निर्यात करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शेवटी केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा