Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

फलटण जि. सातारा येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी तातडीने उच्चस्तरी चौकशी करावी धाराशिव जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महिला आघाडीची मागणी


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

फलटण जिल्हा सातारा उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कथित सहभाग व दरम्यान झालेल्या गंभीर प्रशासकीय त्रुटींच्या पार्श्वभूमीवर तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष व शिवसेना धाराशिव जिल्हा महिला संघटक शामल ताई वडणे(पवार )यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक मार्फत केली आहे

याबाबत सविस्तर मागणी अशी की


फलटण उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत धक्कादायक असून, त्यांनी मृत्यूपूर्वी स्वतःच्या तळहातावर नमूद केलेल्या मजकुरानुसार पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी त्यांच्यावर बलात्कार केला तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत असल्याचे गंभीर आरोप केलेले आहेत. तसेच तत्कालीन पोलीस अधिक्षक .अनिल महाडीक व उप विभागीय पोलीस अधिकारी .राहूल धस यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करुनही त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे महिलांसंबंधातील गुन्हे रोखण्याची आणि त्यांना कायदेशीर संरक्षण देण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांवरच असे आरोप होणे ही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आणि राज्य प्रशासनाच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणारी बाब आहे.



तसेच, सदरहू प्रकरणात संबंधित आरोपींना संरक्षण देण्यासाठी सत्ताधारी पक्षाशी संबंधित माजी खासदार रणजीत नाइक निंबालकर व त्यांचे स्वीय सहायक पदावर असलेले राजेंद्र शिंदे, .रोहित नागतिळे स्थानिक प्रशासनावर अनुचित प्रभाव टाकत असल्याचे गंभीर बाब निदर्शनास आली आहे. राज्याची सत्ता व अधिकाऱ्यांचा अशा प्रकारे गैरवापर होणे हे संविधान व कायद्याच्या शासनाच्या संकल्पनेशी विसंगत आहे.



डॉ. संपदा मुंडे या त्यांच्या सेवाकालात शवविच्छेदन व वैद्यकीय तपासणीचे कार्य पार पाडत असताना पोलिसांकडून काही आरोपींबाबत पक्षपाती प्रमाणपत्र देण्याबाबत दबाव आणला जात होता. वैद्यकीय नैतिकता आणि शासकीय नियमांचे पालन करत हा दबाव नाकारल्यावर त्यांच्यावर छळाची प्रक्रिया तीव्र करण्यात आली होती. त्यांनी दोन-तीन महिन्यांपूर्वी यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केल्याचे व त्यासंदर्भात माहिती अधिकाराखाली अर्जही केला असल्याचे उपलब्ध नोंदी दर्शवितात. तरीसुद्धा योग्य वेळी कारवाई न झाल्याने त्यांचा छळ वाढून अखेरीस त्यांनी आत्महत्या करून जीवन संपविण्याचा अत्यंत टोकाचा निर्णय घेतला, हा राज्यव्यवस्थेसाठी मोठा धोक्याचा इशारा आहे.

तसेच, पीडितेच्या कुटुंबाने राजकीय हस्तक्षेप व दडपशाहीबाबत गंभीर आरोप करत त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. तथापि, पोलिसांकडूनच तक्रारीकडे दुर्लक्ष होणे, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास विलंब होणे, आणि प्राथमिक पातळीवर वस्तुनिष्ठ दृष्टिकोन न दिसणे या सर्व बाबी चौकशीच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित करतात. त्याच प्रमाणे पिडीत वैद्यकीय अधिकारी यांचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न काही समाजमाध्यमातून सुरु आहे. सदरहू बाब गंभीर स्वरुपाची आहे.


उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता, या प्रकरणात केवळ प्रथागत चौकशी न होता, स्वतंत्र व उच्चस्तरीय तपास यंत्रणेकडून निष्पक्ष, सखोल व वेळेवर तपास होणे अत्यावश्यक आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जावी आणि यापुढे कोणत्याही महिला अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणा करण्याकडे तातडीने लक्ष देण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधिताना निर्देश द्यावेत, अशी मागणी या पत्राद्वारे आपणाकडे करीत आहे. त्यावेळेस उपस्थित धाराशिव जिल्हा शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख व शामलताई पवार( वडणे). जिन्नत कोहिनूर सय्यद .उमादेवी तानाजी रणदिवे. ज्योतीताई प्रल्हाद आडगळे. श्रीमती ललिता तानाजी सावंत. व शोभाताई अभिमन्यू कांबळे इत्यादी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा