Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्री आदेश, मात्र महसूल व कृषी विभागाचे अधिकारी विशिष्ट पिकांचे पंचनामे करून शेत शिवारातील इतर पिके वगळत असल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर


 

कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी 

मोबाईल नंबर 8378081147

----- राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्री सांगत आहेत. मात्र महसूल व कृषी विभागाचे अधिकारी विशिष्ट पिकांचे पंचनामे करत असून शेतशिवारातील इतर पिके वगळल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर आहे. 

    राज्यात मे, जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी तर पिके खरडून गेली आहेत. तर केळी, डाळींब, शिताफळ, पेरू, ऊस, मका, कडवळ पिकांचे पंचनामे करण्यात येत नाहीत. मात्र कांदा, मुग, सोयाबीन, उडीद व मका पिकांचे पंचनामे महसूल व कृषी विभागाचे अधिकारी करत आहेत.

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषीमंत्री दत्तात्रय भरणे प्रत्यक्ष पाहणी वेळी अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देतात मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. प्रत्यक्षात अधिकारी मात्र विशिष्ट पिकांचेच पंचनामे करीत असल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर दिसून येत आहे.

    अतिवृष्टीमुळे केवळ एक दोन पिकांचे नुकसान झालेले नाही, तर संपूर्ण शेत शिवारातील उभ्या पिकांचे, घरांचे, रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे निवडक गोष्टींचे न करता सरसकट व्हावेत, अशी मागणी शेतकरी, नागरिकांनी केली आहे.

    आम्हाला फक्त कांदा, मुग, सोयाबीन, उडीद व मका पिकांचेच पंचनामे करण्याचे आदेश असून त्यामुळे इतर बाबत पंचनामे करू शकत नाही. तुम्हाला कोणाला व कुठेही सांगा यामध्ये बदल होणार नाही असे महसूल व कृषी विभागाचे अधिकारी सांगत आहेत.

चौकट - महसूल व कृषी विभागाचे अधिकारी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष न जाताच शेतकऱ्यांकडून जिओ टॅगींगचे फोटो व फाॅर्म भरून घेत असल्याने खरा लाभार्थी वंचित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे. खोटे पंचनामे करणारे अधिकाऱ्यांविरोधात वरीष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे विशाल कांबळे यांनी सांगितले. तर शेतसारा भरा मगच पंचनामे करू असाही हट्ट अधिकारी करत आहेत. अनेकांचे तर पंचनामे नाकारण्यात येत असून मोठे व धनदांडग्यांचे पंचनामे स्विकारले जात आहेत. पंचनाम्यासाठी पैशाची मागणी होत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.

फोटो - अतिवृष्टीमुळे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा