Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०२५

*मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय जीवनगौरव साहित्य पुरस्कार २०२५ प्रसिद्ध ओडिया कवी -हरप्रसाद दास यांना जाहीर*

 *सहसंपादक ,डॉ- संदेश शहा इंदापूर*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो:-9922 419 159*


नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार – २०२५ प्रसिद्ध ओडिया कवी हरप्रसाद दास यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते व प्र - कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच केले जाणार आहे. 

सन २०१० पासून हा पुरस्कार विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासना मार्फत दरवर्षी एका निवडक अ - मराठी कवीला दिला जातो.  रोख एक लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याआधी सुप्रसिद्ध कवी चंद्रकांत देवताले ( हिंदी ), के. सच्चिदानंदन ( मल्याळम ), सीतांशू यशश्चंद्र ( गुजराथी ), सुरजीत पातर ( पंजाबी ), श्रीमती टेमसुला आओ ( इंग्रजी ), विष्णू खरे ( हिंदी ), एच. एस. शिवप्रकाश (कन्नड), अमिताभ गुप्ता ( बंगाली ), नीलिमकुमार ( आसामी ), कुमार अंबुज ( हिंदी ) आदी अनेक दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ओडिया कवी हरप्रसाद दास यांच्या नावाची एकमताने शिफारस केली. समितीत नामवंत कवी व अनुवादक प्रा. चंद्रकांत पाटील, डॉ. गोरख थोरात व श्री. विलास गीते यांचा समावेश होता. समितीचे समन्वयक म्हणून कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे यांनी काम पाहिले असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे यांनी दिली. 

ओडिया कवी हरप्रसाद दास यांचा परिचय :- 

सन १९४६ मध्ये जन्मलेले हरप्रसाद दास यांची आतापर्यंत एकूण ३५ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये बारा काव्यसंग्रह, चार समीक्षा ग्रंथ, एक कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘देश’, ‘अपार्थिव’, ‘प्रेम कविता’,  प्रार्थना के लिये जरुरी शब्द’, ‘गर्भ गृह’ हे काव्यसंग्रह हिंदीतही प्रकाशित आहेत. ‘गर्भ गृह’ला साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाला आहे, ‘वंश’ काव्यसंग्रहाला भारतीय ज्ञानपीठाचा मुर्तीदेवी पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय कवितेसाठी असलेला गंगाधर मेहर राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे. उडिया जनजीवनाबद्दल त्यांनी तीन खंडांत इतिहास लिहिला आहे.  

हरप्रसाद दास यांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. केंद्र सरकारमध्ये विशेष सचिव म्हणून सेवा सुरु असतानाच त्यांची प्रशासकीय ट्रिब्युनलचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. एर्नाकुलम व ओदिशा येथे त्यांनी न्यायदानाचे काम केले. भुवनेश्वर येथील कलिंग तंत्र विद्यापीठात ते प्र-कुलगुरू होते. इन्फिनिटी एज्युकेशन फाउंडेशनचे ते अध्यक्ष होते. त्यांनी जिनिव्हा, बँकॉक, नैरोबी, वॉरसॉ, इंग्लंड, न्यूयॉर्क येथे तज्ञ सल्लागार म्हणून अनेक मंडळांवर काम केले आहे. जेष्ठ साहित्यिका कवयत्री श्रीमती प्रतिभा गारटकर यांनी या पुरस्काराचे स्वागत केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा