Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५

प्रदीप गारटकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष 24 तासाचा अल्टिमेटम पक्षाने योग्य सन्मान न ठेवल्यास जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार!

 सहसंपादक --संदेश शहा

टाइम्स 45 न्यूज मराठी

 मो:--9922 419159


प्रदीप गारटकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षास २४ तासाचा अल्टिमेटम, पक्षाने योग्य सन्मान न ठेवल्यास जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानासाठी इंदापूर नगरपरिषद निवडणूक लढणार, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याचे त्यांचे सूतोवाच, पक्ष सन्मान ठेवत नसेल तर भाजप मध्ये जाण्याचे कार्यकर्त्यांचे गारटकर यांना आव्हान !


इंदापूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत दिनांक १२ नोव्हेंबर रोजी रात्री ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे आमचे नेते आहेत मात्र पक्ष आमचा योग्य आत्मसन्मान ठेवत नसेल तसेच धनवान, अहंकारी उमेदवारास पक्षाचे दरवाजे उघडे करत असतील तर पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक लढवू. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याचे सूतोवाच करत श्री. गारटकर यांनी चेंडू पक्षाकडे पाठवत पक्षास २४ तासांचा अल्टिमेटम दिला. प्रदीप गारटकर यांनी राज्यात पक्ष प्रवक्ते म्हणून काम केले आहे, जिल्ह्यात सर्वाधिक आमदार त्यांनी निवडून आणण्यासाठी आपले योगदान दिले आहे. ते अभ्यासू वक्ते, प्रचंड जनसंपर्क तसेच संघटन कौशल्य असलेले नेते असल्याने पक्ष त्यांचे बंड कसे थंड करणार याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.

इंदापूर नगरपरिषद निवडणुकी संदर्भात पक्ष नेते अजित पवार तसेच दत्तात्रय भरणे यांच्याशी पुण्यात चर्चा केल्यानंतर रात्री इंदापूर येथे श्री. गारटकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. इंदापूरचे आमदार तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे राज्य मंत्रिमंडळात मंत्री असल्याने त्यांना इंदापूर नगरपरिषद ताब्यात हवी आहे, त्यामुळे ते विरोधी धनवान अहंकारी उमेदवारास आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी आमचा विरोध नाही, मात्र पक्ष प्रवेश केला की लगेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून त्यांना तिकीट देण्यास आमचा विरोध आहे. जिल्ह्यात आमदार, माजी आमदार, नेते यांचे प्रवेश मी घेतले मात्र माझ्या इंदापुरात मात्र पक्ष आमच्यावर अन्याय करत आहे. आमची लढाई स्वाभिमानाची आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. मी प्रवाहाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट करून वयाच्या ६५ व्या वर्षी देखील लढण्यास कटिबद्ध असल्याचे श्री. गारटकर यांनी स्पष्ट केले.

श्री. गारटकर पुढे म्हणाले, सन २००४ च्या  विधानसभा निवडणुकीत मला ७५ हजार मते मिळाली होती. मात्र तरी देखील मी माझा कोणताही गट ठेवला नाही. गेली ४५ वर्ष सार्वजनिक जीवनात आहे, मात्र मी सातत्याने अन्यायाविरुद्ध लढत आलो आहे. माझ्या काही कार्यकर्त्यांचे पुनर्वसन झाले मात्र बहुसंख्य कार्यकर्त्यांचे प्रश्न सुटले नाहीत तरी देखील त्यांनी माझ्या कडे पाहून पक्षाचे काम केले. तोच पक्ष माझ्याशी आतून वेगळे वागत आहे. आमचे नेते दत्तात्रय भरणे यांना जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, आमदार, मंत्री होण्यासाठी सर्वात जास्त योगदान मी दिले आहे. ते ज्या धनवान अहंकारी नेत्यास पक्षात घेऊ पहात आहेत, त्यांनी खासदारकी व आमदारकीस कोणाचे काम केले हे पहाणे गरजेचे आहे. सदर पक्षात येऊ पहाणाऱ्या उमेदवाराने विरोधात काम केले असताना देखील मंत्री भरणे आतून वेगळे वागत आहेत, त्यांच्या वागण्याचा परिणाम त्यांना सर्वांना भोगावा लागणार आहे. तुमच्या सर्वांच्या भावना मी जाणून घेऊन पक्षाकडे अमर गाडे, वसंतराव माळुंजकर, बाळासाहेब ढवळे यांच्यासह सहा जणांची नावे नगराध्यक्ष पदासाठी कळविली होती. मी या स्पर्धेत नाही मात्र सर्वसामान्य माणसांचा स्वाभिमान जपून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्हाला इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक लढवून जिंकायची आहे. मागील निवडणुकीत आमच्या उमेदवार अनुराधा गारटकर यांचा पराभव झाला मात्र आम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले नाही. मात्र जे ज्यांच्यामुळे विजयी झाले, ते चारच महिन्यात आपल्या नेत्यांना विसरले, आम्ही पैशावर निवडून आलो असे त्यांनी त्यांच्या नेत्यास सांगितले. त्या धनवान, अहंकारी नेत्यास आपली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी हवी आहे, आम्ही ते कदापी होऊ देणार नाही असे म्हणत त्यांनी भरत शहा यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. वेळप्रसंगी पक्षाचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढविण्याचा एल्गार त्यांनी केला. त्याला उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत उस्फुर्त प्रतिसाद दिला.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने भरत शहा व मित्रपरिवारचा प्रवेश घेऊन त्यांना उमेदवारी दिल्यास इंदापुरात प्रदीप गारटकर यांनी भाजप मध्ये प्रवेश करून निवडणूक लढवावी असे कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे प्रदीप गारटकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच भाजप नेते प्रवीण माने यांची शहरात स्थानिक राजकारण लक्षात घेऊन नवीन आघाडी तयार होण्याचे संकेत आहेत. इंदापूर नगरपरिषदेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष महादेव सोमवंशी यांचाच नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आला असून दिनांक १७  नोव्हेंबर रोजी सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा