सहसंपादक --संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:--9922 419159
दीपक जगताप, इंदापूर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्रीय क्रीडा महोत्सव – २०२५ चे सर्वसाधारण विजेतेपद पुणे विभागाने पटकावले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे व प्र - कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या पटांगणावर हा दोन दिवशीय केंद्रीय क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात विद्यापीठाच्या अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर व नांदेड या आठ विभागीय केंद्रातील एकूण ४०५ खेळाडू विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात कबड्डी, खो - खो, व्हॉलीबॉल, बुद्धीबळ, बास्केटबॉल, टेबल टेनिस, अँथलेटिक्स, बॅडमिंटन सह एकूण १८ विविध प्रकारच्या खेळांच्या चुरशीच्या स्पर्धा रंगल्या. यातून निवडलेले जवळपास १५० खेळाडू विद्यार्थी हे येत्या दिनांक ०४ ते ०८ डिसेंबर २०२५ दरम्यान नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या ‘अश्वमेध’ राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील. दरम्यान निवड झालेया सर्व खेळाडूंना नाशिक येथील विद्यापीठ मुख्यालयात तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या नागपूर विभागीय केंद्राचे संचालक तथा माजी राष्ट्रीय खेळाडू डॉ. धनंजय वेळूकर तर अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य म्हणून प्रा. डॉ. संजीवनी महाले व डॉ. डी. एम. गुजराथी, विद्यापीठाच्या विद्यार्थी व बहि:शाल केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार, विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नितीन ठोके, के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक डॉ. मीनाक्षी गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. धनंजय वेळूकर म्हणाले, खेळाची मैदाने ही व्यक्तिमत्व विकासाच्या प्रयोगशाळा असून कुठल्याही क्षेत्रातील नेतृत्व हे खेळातून अधिक चांगल्या प्रकारे विकसित होते. योग्य वयात खेळाचा व कौशल्यांचा आपल्या जीवनातील प्रगतीसाठी उपयोग करून घेऊन खेळाडूंनी आपले करिअर यशस्वी करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख म्हणाले, खेळ हे संघभावना व सामुहिक विकास करण्याचे प्रभावी माध्यम आहे. खेळाडूंनी आपल्या अंगातील सुप्त कलागुणांचा देखील सर्वांगीण विकास करणे ही काळाची गरज आहे. विद्यापीठाचा गेल्या क्रीडा महोत्सवातील व अश्वमेध स्पर्धेतील रौप्यपदक विजेता खेळाडू अली तांबोळी यास प्रमुख अतिथी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यश देशमुख (अमरावती) व कु. जान्हवी अतकरी (नागपूर) या विद्यार्थी खेळाडूंनी प्रातिनिधिक स्वरूपात क्रीडास्पर्धा आयोजनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख अतिथी यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या खेळाडू विद्यार्थ्यांना पदक, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरवण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून डॉ. मीनाक्षी गवळी, अनिकेत इंगोले, हृषीकेश करकाळे, डॉ. सुनील धोंडगे, प्रा. नामदेव काकड, डॉ. ज्ञानेश्वर गडाख, प्रा. विजय ढिकले, प्रा. हेमंत काळे, प्रा. मेघाराणी पवार, प्रा. पूर्वा ढोके, प्रा. चेतना शर्मा, स्वप्नील पवार, ओम मोरे, प्रा. दिपाली खोडदे, प्रा. अविनाश कदम, प्रा. राजाराम पोटे, प्रा. बाळू शिंदे,
शुभांग मराळे, आरती वाघ, विनायक वाडीले, राहुल आव्हाड, केदार कडाळे, प्रा. पी. के. खैरनार, विकी वळवी, हर्षाली अंडांगळे, प्रा. योगेंद्र पाटील, डॉ. हेमा मांडे, शरद पाटील, मयुरी आल्हाड यांनी काम पाहिले. प्रास्ताविक विद्यापीठ विद्यार्थी व बहि:शाल केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार यांनी तर सूत्रसंचालन डॉ. माधुरी खर्जुल यांनी केले. विजेत्यांच्या नावाची उद्घोषणा व आभार प्रदर्शन सचिन शिंदे यांनी केले. स्पर्धेतील विविध खेळ व त्यातील स्त्री – पुरुष गटातील प्रथम क्रमांकाचे विजेते पुढीलप्रमाणे – बुध्दिबळ - अथर्व बोचरे (अमरावती) व नंदिनी बागुल (नाशिक), टेबल टेनिस - रितेश ठाकरे (नाशिक) व स्नेहल व्यवहारे (नांदेड), ५००० मीटर धावणे खुमानसिंग
ठाकरे (नाशिक) व अश्विनी इंगळे (अमरावती), १५०० मीटर धावणे – अभिजित पगारे (कोल्हापूर) व अदिती मेतकर (अमरावती), ८०० मी. धावणे अभिजित पगारे (कोल्हापूर) व माया भोसले (नांदेड), ४०० मीटर धावणे – साहिल दुधकर (नागपूर) व गौरी गुरव (कोल्हापूर), २०० मीटर धावणे - प्रथमेश थोरवे (पुणे) व वैष्णवी पानसरे (नाशिक), १०० मीटर (मुले) – सार्थक चव्हाण (पुणे) व जान्हवी चोले (नागपूर), थाळीफेक – विश्वजित नलावडे (पुणे) व खुशाली मेश्राम (अमरावती), गोळाफेक – शंतनू मांडरूपे व ऋतुजा बनकर (पुणे), भालाफेक – महेश जाधव (पुणे) व अक्षता फुटाणे (नांदेड), उंचउडी – प्रतिक नन्हे व खुशाली मेश्राम (अमरावती), लांबउडी – चिघळे ग्रीकांत (पुणे) व जान्हवी चोले (नागपूर), तिहेरी उडी (मुले) – अली सबीर
तांबोळी ( पुणे), रिले (मुले) ४×१०० - अजिंक्य हजारे, रियाज तांबोळी, सार्थक चव्हाण, थोरवे प्रथमेश (पुणे), रिले (मुली) ४×१०० – खुशाली मेश्राम, नेहा चव्हाण, अश्विनी इंगळे, पायाल मुंजे (अमरावती), रिले (मुले) ४×४०० - भैय्या ठाकूर, रोहित किणी, पंकज हाते, हर्शल पिठोळे (मुंबई), बॅडमिंटन – चंदनशिव यसराज व अस्मिता खडक्कर (छत्रपती संभाजी नगर), खो-खो (मुले) – पुणे विभाग खो-खो (मुली) – अमरावती कबड्डी (मुले) – पुणे, व्हॉलीबॉल (मुले) – पुणे.
सदर केंद्रीय क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी क्रीडा समन्वयक सिद्धांत टाक, क्रीडा महोत्सवाच्या विविध समितीमधील सदस्य सुनील निकम, भावना भऊरकर, कविता देव, मंगेश पवार, राजेश बर्वे, केशव चौधरी, बांधकाम विभाग, दृक्श्राव्य विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी व विविध समित्यांमधील सदस्य कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा