संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
पुणे : पार्थ पवारांनी घेतलेल्या जागेचीच नाही तर पुण्यातील अन्य २२ जमिनींच्या व्यवहारांच्या फायलींची तपासणी सुरू असून स्टॅम्प खरेदीही उघड होईल, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याने पुण्यातील जमिनीचे मोठे घोटाळे समोर येण्याची चिन्हे आहेत.
पार्थ पवारांच्या कंपनीला विकलेल्या जागेबरोबरच पुण्यातील बोपोडी येथील शासकीय दूध डेअरीची जागा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याच्या प्रकरणाचाही त्यात समावेश आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग कार्यालयातील सहायकाच्या समितीकडून २२ भूखंडांवरील व्यवहाराची कसून तपासणी सुरू झाली आहे. पार्थ पवारांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माहिती घेऊन निर्णय घेतील, चुकीचे असेल तर ते कुणालाही माफ करणार नाहीत, असेही ते म्हणाले.
ज्या जागेवर शासनाचे नाव आहे, ती जागा खरेदी करण्याचा प्रयत्न पार्थ पवारांकडून झाला, तो बेकायदेशीर ठरला आहे. त्यापूर्वी जैन ट्रस्टच्या होस्टेलच्या जागेच्या विक्रीचा व्यवहार प्रचंड दबाव आल्यानंतर रद्द झाला. आता बोपोडीतील दूध डेअरीची शासकीय जागा खासगी मालकाच्या घशात घालण्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवला गेला आहे. बोपोडी परिसरातील कृषी खात्याची नोंद असलेल्या ५ हेक्टर ३५ आर जमिनीवर शासकीय दूध डेअरी होती. ही जागा व्हिजन प्रॉपर्टी कंपनीच्या माध्यमातून ज्यांचे मालकी हक्क दाखवले गेले, त्यात शीतल तेजवाणी व दिग्विजय पाटील यांचीही नावे आहेत. ही नावे पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणातही आहेत. याच प्रकरणात पुणे शहराचे तहसीलदार येवले यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून येवले यांच्याविरोधात कारवाईची शिफारस केली होती, अशी माहिती आता समोर आली आहे. मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनने याच्या चौकशीची मागणी केली आहे.
मी पार्थ यांना भेटलो नाही : गावंडे
माझे नाव अमेडिया या कंपनीसोबत व्यवहार केल्याचे चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. मी कधीही पार्थ पवार, दिग्विजय अमरसिंह पाटील किंवा त्यांच्या भागीदारांना भेटलो नाही. तसेच अमेडिया कंपनी किंवा त्या कंपनीचे कोणतेही भागीदार, तसेच शीतल तेजवाणी यांच्याशी माझा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. माध्यमामध्ये माझे नाव या कंपनीशी माझा कोणताही संबंध नसताना जोडले गेले आहे. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा गैरसमजुतीतून झाला असून मी चौकशी यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत आहे, असे हेमंत गावंडे यांनी सांगितले आहे.
घोटाळ्याचे नेमके काय आहे प्रकरण
सूर्यकांत येवले तहसीलदार म्हणून शहर मामलेदार कचेरी येथे नियुक्तीस हाेते. १२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ या काळात त्यांनी अधिकारपदाचा गैरवापर करून शहरामध्ये मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ चा महानगरपालिका क्षेत्रात लागू नाही. बोपोडी येथील एकूण ५ हेक्टर ३५ आर ही जमीन १८८३ पासून कृषी विभागाकडे म्हणजेच शासनाच्या ताब्यात तसेच वहिवाटीत आहे. या जमिनीचे मालक आणि ताबेदार हे कृषी विभागाचे नाव असल्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश दिले होते. या जमिनीचा अपहार करून या जमिनीवर व्हिजन प्रॉपर्टीतर्फे अर्जदार हेमंत गावंडे, त्यांच्या वतीने राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस तसेच विद्यानंद पुराणिक, जयश्री संजय एकबोटे, शीतल तेजवाणी, दिग्विजय अमरसिंग पाटील यांच्याशी संगनमत करून सरकारी मिळकतीवर त्यांचा मालकी हक्क दिसून येत आहे, असा बेकायदा आदेश आणि पत्र तयार करून शासनाची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
तहसीलदार येवलेंसह ९ जणांविरुद्ध गुन्हा
कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज कंपनीचा आणखी एक जमीन गैरव्यवहार उघडकीस आला आहे. कृषी खात्याकडे बोपोडी येथील ५ हेक्टर जमिनीचा ताबा असताना तहसीलदारांना हाताशी धरून जमिनीचा अपहार करून बेकायदा आदेश आणि पत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह खडक पोलिस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा