*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
Jain Hostel : आणखी एका जैन हॉस्टेलचा गैरव्यवहार समोर- धंगेकर जीवप्रभा ट्रस्टच्या भूखंड विक्रीबाबत रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप.
३ हजार ७०० चौरस फूट जमीन विक्रीसाठी काढण्यात आल्याचा गंभीर आरोप
पुणे शहरातील जैन धर्मीय समाजाच्या हॉस्टेलच्या जमिनींवर गैरव्यवहारांचे प्रकरण थांबण्याचे नाव घेत नाही. मॉडेल कॉलनीतील प्रसिद्ध 'एच.एन.डी. जैन बोर्डिंग'च्या भूखंड विक्री व्यवहारावरून आधीच खळबळ माजलेली असतानाच, आता आणखी एक नवे प्रकरण समोर आले आहे. औंध येथील जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीची तब्बल ३३ हजार ७०० चौरस फूट जमीन विक्रीसाठी काढण्यात आली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकरयांनी केला आहे.
धंगेकर यांनी सोमवारी सोशल मीडियावरून यासंदर्भात माहिती देत, "पुण्यात पुन्हा एक जैन हॉस्टेल घोटाळा उघड झाला आहे," असा थेट आरोप त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टने धर्मादाय आयुक्त कार्यालयात सेक्शन ३६ अंतर्गत विक्रीसाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रस्तावामध्ये ट्रस्टच्या काही विश्वस्तांचा सहभाग असून, त्यात एच.एन.डी. जैन बोर्डिंगचा विश्वस्त चकोर गांधी याचेही नाव विशेषत्वाने घेतले जात आहे.
धंगेकर यांनी प्रश्न उपस्थित केला की, "हा प्रकार एखाद्या टोळीच्या कारभारासारखा तर नाही ना? ट्रस्टच्या भूखंड विक्रीच्या माध्यमातून काही मंडळींनी पुन्हा एकदा समाजाच्या मालमत्तेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे का?" त्यांनी या व्यवहारामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचाही संशय व्यक्त केला आहे.
आणखी एका जैन हॉस्टेलचा गैरव्यवहार समोर...!
पुण्यातील औंध येथील जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट (पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट) यांच्या मालकीची 33,700 चौरस फुटांची जागा विक्रीसाठी ट्रस्टींनी प्रस्तावित केली आहे. या विक्रीसाठी ट्रस्टच्या ट्रस्टींनी सेक्शन 36 अंतर्गत पुणे येथील चॅरिटी कमिशनर…
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) November 1, 2025
पूर्वीच्या एच.एन.डी. जैन बोर्डिंगच्या जागा विक्रीप्रकरणातही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी धर्मादाय आयुक्तांनी व्यवहारावर स्थगिती दिली होती. मात्र, अद्यापही संबंधितांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत, याबाबत धंगेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. "जर या प्रकरणात दोषींवर कारवाई झाली नाही, तर ट्रस्टच्या भूखंड विक्रीचा धंदा पुढेही सुरूच राहील," असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या नव्या प्रकरणामुळे जैन समाजात तसेच पुणे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. धार्मिक आणि शैक्षणिक उद्देशासाठी देणगीदारांनी उभारलेल्या ट्रस्टच्या मालमत्ता, भूखंड हे काही मोजक्या व्यक्तींच्या फायद्यासाठी विक्रीसाठी काढल्या जात असल्याची चर्चा समाजात रंगली आहे. आता या प्रकरणात धर्मादाय आयुक्त काय भूमिका घेतात आणि प्रशासन पुढे काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा