*सहसंपादक- डॉ. संदेश शहा*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9922 419 159*
इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील प्रसिद्ध श्री दत्त देवस्थान मध्ये त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त भक्तिभाव, हरिनाम आणि दिव्य तेजाचा संगम अनुभवायला मिळाला.“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ” या गजरात श्री गुरुदत्तांची पालखी मंदिर प्रदक्षिणा करून भक्तिमय वातावरणात विसावली. हा सोहळा पंचक्रोशीतील भाविकांना आध्यात्मिक पर्वणी ठरला.
देवस्थान परिसरात या वेळी सजविण्यात आलेल्या श्री गुरुदेव दत्तात्रय मूर्ती तसेच सिद्धेश्वर संत गुलाब बाबा मूर्ती यांच्या अद्भुत सजावटीने वातावरण भक्तीमय झाले होते. त्यामुळे भाविकांना दैवी आनंदाचा अनुभव आला. फुलांच्या हारांनी, दीपमाळांनी आणि सुवर्ण झळाळीने सजविलेल्या मूर्तींच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. या भव्य सजावटीमुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तीभावाने ओथंबून गेला.
या निमित्त अन्नदान, हरिनाम सप्ताह, भजन आदी कार्यक्रम संपन्न झाले. श्री. यादव परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो स्वयंसेवकांनी भक्तांना प्रसाद वितरण केले. भाविकांनी हरिनामाच्या गजरात दत्तगुरूंच्या जयघोषात सक्रिय सहभाग नोंदविला.
प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात देवस्थानात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. हजारो भाविक या उत्सवात सहभागी होऊन कीर्तन, प्रवचन, भजन, नामस्मरणाचा आनंद घेतात. देवस्थानचे प्रमुख तानाजीराव गायकवाड यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात बारा पौर्णिमांना पालखी सोहळा व अन्नदानाचे आयोजन संपन्न होते. या सातत्यपूर्ण सेवाभावी परंपरेमुळे शहाजीनगर दत्त देवस्थान हे इंदापूर तालुक्यातील श्रद्धेचे केंद्रस्थान बनले आहे.
श्री दत्तगुरू व सिद्धेश्वर संत गुलाब बाबांच्या मूर्तींमधील तेज आणि भक्तिभावाने त्रिपुरारी पौर्णिमेला आध्यात्मिक आनंद मिळाला असल्याचे मत भक्तांनी व्यक्त केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा