सहसंपादक --संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:--9922 419159
कुठल्याही खेळातील प्रगतीसाठी समर्पण, शिस्त, आत्मविश्वास व मेहनत आवश्यक आहे. खेळाकडे मनोरंजन किंवा टाईमपास म्हणून न बघता स्पर्धा परीक्षांप्रमाणे तयारी केल्यास त्यात नक्कीच उज्वल भविष्य आहे, त्यातून यशस्वी करिअर देखील करता येते असे प्रतिपादन शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. डॉ. सुनील मोरे यांनी येथे केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ संचलित दोन दिवशीय केंद्रीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या पटांगणावर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा केंद्रीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले, कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना आहिरे, म. वि. प्र. शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, विद्यापीठ विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख, नाशिक विभागीय केंद्राचे संचालक डॉ. एस. आर. निकम, के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक डॉ. मीनाक्षी गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी डॉ. मोरे पुढे म्हणाले, आता क्रमिक शिक्षणासोबत खेळातून देखील तेवढीच प्रगतीच साधता येते. त्यामुळे विविध खेळांचे महत्व वाढलेले आहे. खेळाच्या माध्यमातून तुम्ही पद, पैसा व प्रतिष्ठा प्राप्त करू शकता. सध्याच्या धावपळीच्या व ताण तणावाच्या काळात शारीरिक तंदुरुस्ती व आरोग्य याचे महत्व वाढले आहे, जे खेळा तून सहज प्राप्त होते. मैदानी असो वा बैठकीचे खेळ दोन्हींचे आपापले महत्व आहे. खेळाडूंनी आपल्या आवडीच्या क्रीडा विषयासंबंधी छोटे मोठे काही शिक्षणक्रम पूर्ण करावेत, क्रमिक शिक्षणासोबत अतिरिक्त कौशल्ये प्राप्त करावीत असे आवाहनही त्यांनी केले.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे म्हणाले, आयुष्यात यश कसे सांभाळावे व अपयश कसे पचवावे हे खेळातून शिकायला मिळते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शैक्षणिक प्रगतीसोबत क्रीडा क्षेत्रातील प्रगतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ इतर विद्यापीठांप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सव सारखे इतर अनेक स्तुत्य उपक्रम राबवत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन म्हणाले, खेळाच्या माध्यमातून खेळाडू हा शारीरिक व मानसिक दृष्ट्यादेखील मजबूत होतो. त्यामुळे जीवना तील कुठल्याही प्रसंगाचा सामना करून तो यशस्वी होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी प्रमुख अतिथी यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वज फडकविण्यात आला. महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. अली साबीर अस्लम, प्रणव साळुंखे व ऋतुजा बनकर ( सर्व पुणे ) तसेच उज्वल नारद ( नागपूर ) या विद्यार्थी खेळाडूंनी क्रीडाज्योत कार्यक्रम स्थळी आणली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केंद्रीय क्रीडा महोत्सव ज्योत प्रज्वलित करून सदर केंद्रीय क्रीडा महोत्सव उद्घाटन कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यापीठाच्या अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर व नांदेड या आठ विभागीय केंद्राच्या संघाने प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. नाशिक व पुणे या संघांमधील कबड्डीच्या सामन्याने या क्रीडा महोत्सवास प्रत्यक्ष सुरुवात झाली. या केंद्रीय क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो - खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, बुद्धीबळ, अँथलेटिक्स, बॅडमिंटन या खेळांचा समावेश असून त्यात विद्यापीठाच्या आठही विभागीय केंद्रातील एकूण ४०१ खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यात ८३ विद्यार्थिनी खेळाडू व ३१८ विद्यार्थी खेळाडू यांचा समावेश आहे. यातून निवड झालेले विद्यार्थी हे येत्या दिनांक ४ ते ८ डिसेंबर २०२५ दरम्यान नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ अश्वमेध क्रीडा महोत्सव स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठ विद्यार्थी व बहि:शाल केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार यांनी तर सूत्रसंचालन डॉ. माधुरी खर्जुल व डॉ. जागृती चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन मंगेश पवार यांनी केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा