*सहसंपादक- डॉ-संदेश शहा इंदापूर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9922419159*
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक इंदापूर नगरीत पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर विविध पक्षांनी आपले उमेदवार निश्चित करण्यास सुरुवात केली. मात्र इंदापूरचा नगराध्यक्ष कोण, कुठल्या पक्षाकडून होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही निवडणूक राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रतिष्ठेची आहे तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाची आहे. भाजप नेते नगराध्यक्ष उमेदवाराच्या शोधात असून ही निवडणूक भाजपा लढविणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडी एकसंघ लढणार की स्वतंत्रपणे आपली ताकद आजमावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे !
राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस मध्ये असताना मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सत्ता नगरपरिषदेवर आली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे आठ व जनतेतून नगराध्यक्ष तर विरोधी एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ उमेदवार निवडून आले होते. नगराध्यक्षांना आणखी एक मताचा कामकाजात अधिकार मिळाल्यामुळे मावळत्या नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा यांना त्याचा लाभ झाला.
त्यांनी एकहाती कारभार करत इंदापूर नगरपरिषदेस सलग पाच वेळा स्वच्छता अभियानात पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिले. त्यांनी चौफेर विकास करण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा निवडणूक घोषित झाल्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. त्यानंतर मात्र श्री. पाटील व शहा परिवार यांच्यात मनभेद व मतभेद झाले. त्यामुळे त्यांच्यात राजकीय दुरावा तयार झाला. मात्र सौ. शहा यांनी पती मुकुंद शहा तसेच दीर भरत शहा यांच्या सहकार्याने शहरात आपल्या कामकाजाची छाप निर्माण केली.
झालेल्या कामावर आता त्यांचे प्रतिनिधी म्हणून माजी उपनगराध्यक्ष भरत शहा हे यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत जिकडे शहा परिवार तिकडे विजयाचे समीकरण असल्याची नागरिकात चर्चा आहे.
मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विजयाची तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रदीप गारटकर यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. खरे तर त्यांच्या कामगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेस ने त्यांना विधानपरिषद देणे गरजेचे होते.
मात्र पक्षीय तडजोडीच्या राजकारणात त्यांना संधी मिळाली नाही. त्यांच्या पत्नी सौ. अनुराधा गारटकर यांना मागील नगराध्यक्ष पद निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागले. मात्र नाउमेद न होता प्रदीप गारटकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून शहर विकासास कोट्यावधी रुपयांचा भरीव निधी आणला. मागील निवडणुकीत प्रदीपदादा गारटकर यांच्या नेतृत्वाखाली सौ. हेमलता माळुंजकर या नगरसेविका म्हणून विजयी झाल्या. त्यांनी प्रभागात काम देखील केले. त्यांचे पती वसंतराव माळुंजकर हे प्रदीपदादा गारटकर यांचे निष्ठावान असून त्यांनी इंदापूर रोटरी क्लबच्या माध्यमातून रोटरी जिल्हा ३१३१ मध्ये मोठे काम केले आहे. राष्ट्रवादी कडून ते देखील नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र सर्व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रदीपदादा गारटकर यांनीच ही निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ नसून ती विभागली गेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण या पक्षाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यांच्या विविध संस्थांचे शहरात जाळे आहे. नगरपरिषदेवर देखील त्यांचे वर्चस्व होते. त्यामुळे त्यांची शहरात ताकद आहे मात्र ते सर्वांची कशी एकजूट करतात किंवा बेरजेचे राजकारण करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. शहा यांचे नगराध्यक्षपद कार्यकाळ संपल्यानंतर मध्यंतरी तीन वर्ष गेली. त्यामुळे त्यांना केंद्र व राज्य सरकारकडून निधी आणण्यास मर्यादा आल्या. मात्र त्यांनी शहरावरची आपली पकड ढिल्ली होऊ दिली नाही. त्यामुळे त्यांची संपूर्ण पॅनेल सह लढण्याची तयारी आहे. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत भरत शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या पक्षाचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात तीव्र राजकीय दुरावा निर्माण झाला आहे. त्यातच मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, हर्षवर्धन पाटील सहकारी मोटार वाहतूक संघाचे अध्यक्ष रघुनाथ राऊत, संजय शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेऊन धक्का दिला. अशोक इजगुडे यांची नगराध्यक्षपदाची कारकिर्द देखील चांगली झाली आहे. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मालोजीराजे गढी संवर्धन, टाऊन हॉल सुसज्जीकरण, शहर चौक सुशोभीकरण यासह इतर विकासकामे करून शहराचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला
आहे. इंदापूर शहर व्यापारी संघाचे प्रतिनिधी म्हणून भरत शहा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करमाळा व इंदापूर तालुका जोडण्यासाठी भीमा नदीवर पुलाची केलेल्या मागणीचा पाठपुरावा करून मंत्री भरणे यांनी हा पूल मंजूर करून घेतला, त्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. त्यामुळे शहराचा व्यापार वाढणार आहे. त्यामुळे भरत शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करावा यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला प्रदीप गारटकर यांना डावलून शहर भरत शहा यांच्या हातात देणे शक्य नाही. त्यामुळे प्रदीप गारटकर यांना विधानपरिषदेवर किंवा मंडळावर तर भरत शहा यांना इंदापूर नगरपरिषद नगराध्यक्ष म्हणून संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्रदीप गारटकर व भरत शहा यांच्यात कसे मनोमिलन होते, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे यश अवलंबून आहे !
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना पाठबळ दिले आहे. नगराध्यक्षपदासाठी त्यांचा नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. एल. एस. कदम किंवा डॉ. ठोंबरे, शेखर पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. माजी नगराध्यक्ष सौ. अलका ताटे व माजी उपनगराध्यक्ष कृष्णा ताटे यांनी देखील नागरी संघर्ष समितीच्या माध्यमातून दोन वर्षांपासून शहराच्या प्रश्नावर तीव्र लढा दिला आहे. त्यांनी देखील लढण्याची तयारी केली आहे. हर्षवर्धन पाटील त्यांना उमेदवारी देतात का दुसरा उमेदवार देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यातच शिवसेना शहर प्रमुख महादेव सोमवंशी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणुक लढविण्याची घोषणा करून काही उमेदवारांची घोषणा करून आघाडी घेतली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने सीमा कल्याणकर देखील लढण्याच्या मनस्थितीत आहेत. भाजप शहराध्यक्ष किरण गानबोटे हे भाजप नेते प्रवीण माने, मयुरसिंह पाटील, माऊली वाघमोडे यांच्या माध्यमातून समर्थ पर्याय शोधत आहेत. तर भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे यांनी महायुती बरोबरच राहणार असल्याची घोषणा केली आहे. त्यातच इंदापूर शहरात एमआयएम पक्षाकडून उमेदवार उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे ही निवडणूक दुरंगी होणार, चौरंगी होणार की सप्तरंगी होणार यावर राजकीय धुरिणांमध्ये पैजा लागल्या आहेत. निवडणूक प्रचारास वेळ कमी असल्याने पडद्यामागचे किंग मेकर सक्रिय झाले असून यंदा लक्ष्मी दर्शन मोठ्या प्रमाणावर होणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे.
_______________________ऍडव्हर्टाईस___________________












कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा