Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याच्या माध्यमातून तसेच ओंकार शुगरच्या सहकार्याने सहकार संवर्धित करण्याचा देशातील पहिलाच पथदर्शी उपक्रम --हर्षवर्धन पाटील पुणे जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर देऊ-- बाबुराव बोत्रे पाटील

सहसंपादक-- डॉ. संदेश शहा

   टाइम्स 45 न्यूज मराठी

     मो:-9922 419 159


  • कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना ही आपली सर्वांची मातृसंस्था आहे, या संस्थेमुळेच इंदापूर तालुका सुजलाम सुफलाम होऊन सर्वांगीण क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याच्या माध्यमातून व ओंकार शुगर च्या सहयोगातून सहकार टिकविण्याचा हा महाराष्ट्रातील बरोबरच देशातील पहिलाच पथदर्शी नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या सहयोगाच्या माध्यमातून सहकारातील शेतकरी, कामगार यांना आर्थिक न्याय देण्याचे काम होणार असून शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे वेळेवर गाळप व उच्चांकी भाव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सॊमवार दि. ३ नोव्हेंबर रोजी दिली.
  • महात्मा फुलेनगर ( बिजवडी ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि. व सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टीलरी पॉवर प्रा.लि. चा सन २०२५-२६ च्या
  • ३६ व्या हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगामाचा शुभारंभ हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, रेखाताई बोत्रे पाटील उपस्थित होत्या.
  •  हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, कर्मयोगी शंकररावजी पाटील व ओंकार शुगरचा सहयोग (कोलाब्रेशन ) सहकाराच्या सेक्शन २० नुसार सहकार टिकवण्यासाठीचा पहिलाच नावीन्यपूर्ण प्रयोग आहे. त्यामुळे शंकररावजी पाटील कारखाना हा सहकारीच राहणार असून सहकारातील कर्तव्ये, जबाबदाऱ्या कायम राहणार आहेत. ओंकार उद्योग समूहाचे प्रमुख बाबुराव धोत्रे पाटील यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. कष्टाने, प्रामाणिकपणे त्यांनी शेतकऱ्यांसाठी कारखानदारी चालवली आहे. 
  •  ते पुढे म्हणाले, चालू गळीत हंगामामध्ये  कारखान्याकडे ३२ हजार एकर ऊसाची नोंद झाली आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना आपली मातृसंस्था आहे. श्रद्धेय  शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी उभारलेल्या या मातृसंस्थेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे गेली ३५ वर्षे संसार प्रपंच यशस्वीरित्या मार्गी लागले आहेत. त्यातून शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती झाली आहे. त्यामुळे कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्यास गत वैभव प्राप्त करून देणेसाठी आपण सर्वांनी एकत्रित मिळून काम करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने इथेनॉलचे आगामी हंगामासाठी १०५० कोटी लि.चे टेंडर काढले असून त्यामध्ये तब्बल ६५० कोटी लि. इथेनॉल कोटा हा साखर उद्योगासाठी दिलेला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी, असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. शेतकऱ्यांनी ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करून कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पन्न घेणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कर्मयोगी कारखान्याला गळीतास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन ही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
  •  ओंकार शुगर समूहाचे चेअरमन बाबुराव बोत्रे  म्हणाले, आजपर्यंत साखर कारखाने हे भाडेतत्त्वावर किंवा लिजवर घेतले जात होते. परंतु कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याशी सहयोगी तत्वाचे हे रोल मॉडेल महाराष्ट्रातील नवे तर भारतातील पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. हे रोड मॉडेल सहकार क्षेत्रासाठी नवसंजीवनी ठरणार आहे. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. ओंकार शुगर ग्रुपच्या माध्यमातून दररोज १ लाख ५ हजार मे. टन उसाचे गाळप, आसवानी प्रकल्पातून २० लाख केपीएल उत्पादन, को-जन प्रकल्पातून २४० मे.वॅट वीज निर्मिती केली जात आहे तर ८ लाख शेतकरी संबंधित आहेत. शेतकऱ्यांच्या उसाचे २५ दिवसात पेमेंट, ऊस वाहतूकदारांचे व कर्मचाऱ्यांचे प्रत्येक महिन्याला पेमेंट हे ओंकार शुगर ग्रुपचे ब्रीदवाक्य असल्याचे बाबुराव बोत्रे पाटील यांनी स्पष्ट केले.


  •  प्रास्ताविक जितेंद्र माने यांनी केले. याप्रसंगी सत्यनारायण पूजा कारखान्याचे संचालक सतीश व्यवहारे व अलका व्यवहारे या  उभयतांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, संचालक मंडळ, ऊस तोडणी वाहतूकदार तसेच कार्यकारी संचालक विजयसिंह शिर्के, जनरल मॅनेजर रणजीत तावरे, अधिकारी, कर्मचारी व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन भोसले तर आभार संचालक भूषण काळे यांनी मानले.
  • कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टीलरी पॉवर प्रा.लि. ऊस देऊन शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. चालू हंगामामध्ये १४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास शेतकऱ्यांच्या ऊसाला पुणे जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर देऊ, असे ओंकार शुगरचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी नमूद करताच शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
  •  फोटो:-महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि., सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टीलरी पॉवर प्रा.लि. चा गळीत हंगाम शुभारंभ करताना हर्षवर्धन पाटील. सोबत ओंकार शुगरचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील व मान्यवर.
                             *जाहिरात*



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा