सहसंपादक--- डॉ, संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9922 419 159
निरा भिमा करखान्याचे ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार्य करावे : असे आवाहन संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे
नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालू सन २०२५-२६ च्या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामामध्ये प्रति टन ३१०१ रुपये प्रमाणे उच्चांकी उचल ही विना कपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शुक्रवारी जमा करण्यात आली. शेतकऱ्यांना अधिकच्या ऊस दरा साठी चालू हंगामामध्ये ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी दि. ५ डिसेंबर रोजी केले.
इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथे नीरा भीमा कारखान्यावर शेतकऱ्यांशी सुसंवाद साधताना हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी कारखान्याच्या इतिहासामध्ये प्रथमच उच्चांकी प्रति टन ३१०१ रुपये प्रमाणे उचल जाहीर केल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांचा कारखान्याचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक लालासाहेब पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आगामी काळामध्ये नीरा भीमा कारखान्याचा समावेश हा राज्यातील सर्वोत्तम कारखान्यांमध्ये होईल, असा ठाम विश्वास यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखान्याचे कामकाज केले जात आहे. चालू गळीत हंगामामध्ये कारखान्याने ३४ दिवसात २ लाख मे. टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. कारखान्याचे तांत्रिक पॅरामीटर उत्कृष्ट असून कारखान्याने मंगळवारी दि. २ डिसेंबर रोजी एका दिवसात ६४०० मे. टन ऊसाचे गाळप करून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. कारखान्यामध्ये ४ वर्षांपूर्वी धाडसी निर्णय घेऊन झिरो मिल टाकण्यात आली, त्यामुळे सध्या प्रतिदिनी ३५०० मे. टन गाळप क्षमता असतानाही कारखाना सध्या ५६०० ते ६००० मे. टन क्षमतेने व उच्च गुणवत्तेने गाळप होत आहे.कारखान्याला आर्थिक अडचण असताना देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून उच्चांकी ३१०१ रुपये प्रमाणे उचल देण्याचा निर्णय घेतला असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील भाषणात म्हणाल्या, कारखाना उत्कृष्टपणे चालू असून इथेनॉल, सहवीज निर्मिती, सेंद्रिय खत प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्याबद्दल ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक यांचे अभिनंदन केले. शेतकऱ्यांनी गुणवत्तेचा सर्व ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे, त्यामुळे ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्टे पूर्ण होऊन आगामी काळातही चांगला ऊस दर देणे शक्य होईल, अशी ग्वाही अध्यक्ष सौ. भाग्यश्री पाटील यांनी दिली.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी केले. यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, ज्ञानेश्वर वाघ, विलास ताटे देशमुख, नितीन शिंदे, नंदकुमार लावंड यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी सुरेश मेहेर, दत्तू सवासे, दत्तात्रय शिर्के, विकास पाटील, प्रतापराव पाटील, धनंजय कोरटकर, मनोज पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, अमरदीप काळकुटे, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, तानाजी नाईक, शिवाजीराव शिंदे, रवींद्र जगदाळे, आबासाहेब शिंगाडे, सुभाष काळे उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे तर आभार कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी मानले.
•चौकट १) :
शेतकऱ्यांनी ऊस तोडणीसाठी घाई करू नये.- सौ. भाग्यश्री पाटील.
चांगला दर देणाऱ्या कारखान्यांना ऊस देण्यासाठी शेतकरी थांबतात, असा अनुभव आहे. त्यामुळे ऊसाला चांगला दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ऊस तोडणीची घाई करू नये. शेतकऱ्यांचा एक टिपरू ऊस देखील गाळपा आभावी शिल्लक राहणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील यांनी यावेळी दिली.
•चौकट २) :-
जिल्हा बँकेकडून कारखान्याची अडवणूक.
नीरा भीमा कारखान्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ५० कोटी रक्कमेचे अल्पमुदत इथेनॉल कर्ज मे महिन्यात मागितले होते. त्यावेळी कारखान्याकडे १७ कोटीची रक्कम ही शेतकऱ्यांची देय ऊस बिल देणेसाठी उपलब्ध झाली होती. त्यावेळी बँकेने सांगितले की १७ कोटीची कर्जाची रक्कम भरल्यास कारखान्याला ५० कोटी रुपयांचे कर्ज देऊ. त्यानुसार कारखान्याने १८ कोटी रुपये रक्कम बँकेकडे भरली. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांच्या शिफारशी होऊन बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कारखान्यास ५० कोटी ऐवजी ४० कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आले. मात्र त्यानंतर बँकेने कारखान्यास कर्ज रक्कम देण्यासाठी टाळाटाळ सुरू केली. त्यावेळी ज्येष्ठ नेते मा. शरदचंद्र पवार साहेब यांनीही बँकेस फोन करून मंजूर कर्ज रक्कम कारखान्यास द्यावी, असा फोन केला. तसेच मी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटून मंजूर कर्ज देणे बाबत अनेकदा बोललो. तरी देखील कारखान्यास मंजूर कर्ज रक्कम देण्यात आली नाही. नंतर तब्बल दोन महिन्यांनी कारखान्याला पत्र पाठवून कर्ज देता येणार नाही असे कागदोपत्री कळविण्यात आले. याचवेळी निरा भीमा कारखान्यास कर्ज न देता जिल्ह्यातील इतर कारखान्यांना मात्र कर्ज देण्यात आले. जर कारखान्यास कर्ज देणार नव्हते तर १७ कोटी रुपयांची रक्कम बँकेकडे भरणेऐवजी आम्ही शेतकऱ्यांची ऊस बिले त्यामधून दिली असती. जिल्हा बँके कडून नीरा भीमा कारखान्याला कर्ज देणेबाबत अडवणूक करण्यात आल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी शेवटी केला.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा