*करमाळा ---प्रतिनिधी*
*अलिमभाई शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यातील अतिशय महत्वाची म्हणुन सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि परत एकदा करमाळा तालूका हा गटातटाच्या राजकारणासच महत्व देतो हे निश्चित झाले. वास्तविक पाहता सावंत गटाने आठ जागा व नगराध्यक्ष पद जिंकुन शहराच्या राजकीय समीकरण नव्याने लिहण्यास राजकीय पंडीताना भाग पाडले. या निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप गटाने शिवसेनेची तर बागल गटाने भाजपाची निशाणी घेऊन निवडणुक यंत्रणा राबवली.
तर माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षाच्या तिकीटावर आठ उमेदवार उभे केले होते. विविध पक्षांच्या झुली पांघरल्या तरी आत राजकीय गटच एकमेकांच्या विरोधात लढत होते. विठ्ठल अप्पा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सावंत, सुनिल सावंत व राहुल सावंत या युवानेत्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली. नगराध्यक्ष पदाची उमेदवार महिलांसाठी राखीव असल्याने सावंत कुटुंबातील रणरागिणी तेवढ्याच ताकदीने प्रचारात उतरल्याचे दिसून आले.
प्रत्येक प्रभागात सभा न घेता होम टु होम प्रचारावर त्यांनी भर दिला. मतदारांपर्यंत जाहिरनामा पोहचवून बदल का हवा ते पटवूंन देण्यात सावंत गट यशस्वी झाल्यानेच त्यांना हे अद्वितीय यश मिळाले. दुसरीकडे बागल गटाने व देवी गटाने कमळ घेऊन काही महिने झाले होते. हे दोन्ही गट भाजपाचे विचार घरोघरी पोहचवण्यात कमी पडत होते तर दुसरीकडे भाजपाचे पुर्व तालूकाध्यक्ष गणेश चिवटे व त्यांचे सहकारी यांनी अनेक दशके भाजपाची पाळेमुळे बळकट करण्यात व संघटना वाढवण्यात दीर्घ काळ घालवला होता. पण ऐनवेळी देवी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाल्याने काना मागुन आला अन तिखट झाला अशी काही भावना संघ आणि भाजपाच्या मुळ कार्यकर्त्यांमध्ये झाली होती. यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अनेक भेटी करमाळा शहरात दिल्या बागल, देवी, व मुळ भाजपा यांचा मेळ बसवला. पण हि वरवरची राख फुंकली तर आत विरोधाचा अग्नी प्रखर असल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. शेवटी नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार पराभुत झाल्या. पण कमळाच्या चिन्हावर पहिल्यांदाच सात नगरसेवक निवडुण येणे ही मोठी बाब आहे.
माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी विधानसभा निवडणुक अपक्ष म्हणुन लढवली होती. राष्ट्रवादी पक्षाने त्यांना वारंवार ऑफर देऊनही त्यांनी घड्याळ नाकारले. हा अनुभव ताजा असतानाच परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आठ उमेदवार या निवडणुकीत उतरवले. पण सर्वच्या सर्व पराभुत झाले. काही उमेदवार तर तीन अंकी मतेही मिळवू शकले नाहीत. हा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या साठी एक मोठा धक्का असुन येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर या निकालाचा परिणाम निश्चितच होईल. शेवटी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी धनुष्य बाण हाती घेऊन सर्व उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले. पण मागील पाच वर्षांपासून राज्यात सर्व नगरपालिकेच्या वर प्रशासक नेमले होते. त्या प्रशासकाची कामगिरी ही जनतेला त्रासदायक ठरलेली होती. याचा फटका शिवसेनेस बसला. एकंदरीतच करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी बदल घडवून आणला हे मात्र खरे.
*****: जाहिरात****"








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा