Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २८ डिसेंबर, २०२५

*आमदार नारायण आबा पाटील यांचा पुतण्या पैलवान जयदिप पाटील ठरला सुवर्णयुग केसरी गदेचा मानकरी,* *आता ध्येय हिंदकेसरी होण्याचे..."*

 *करमाळा प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


करमाळा तालुक्यातील पै.जयदिप पाटील नावाच्या एका तरुण पैलवानाने काल निमगाव केतकी ता.इंदापूर येथील कुस्ती मैदान गाजवले.निमगाव (केतकी) येथील श्री सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट व श्री सुवर्णयुगेश्वर पतसंस्था यांचे वतीने श्री गणेश यात्रे निमित्ताने भव्य निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते.अनेक वर्षाची अविरत परंपरा असलेली ही कुस्ती स्पर्धा होय.शेवटच्या कुस्तीमधील विजेता हा सुवर्णयुग केसरी २०२५ चा मानकरी ठरणार होता.या शेवटच्या कुस्तीसाठी चांदीची गदा व १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवले गेले होते.

"वास्तविक हि शेवटची कुस्ती हरीयाणा केसरी पैलवान मलंग आणि गंगावेश तालमीतील पैलवान प्रकाश बनकर यांचेत ठरली गेली होती.परंतु कुस्ती मैदानाच्या काही दिवस अगोदरच पैलवान प्रकाश बनकर हा आजारी पडला व अनफिट असल्याने तो कुस्ती खेळणार नाही हे नक्की झाले.यामुळे मग पैलवान जयदिप राजेंद्र पाटील यास संयोजकांनी व निमगाव केतकी ग्रामस्थांनी शेवटची कुस्ती आपण खेळावी अशी विनंती केली.मुळातच पैलवान जयदिप पाटील याची यंदाच्या हिंद केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यंदा तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व हिंद केसरी स्पर्धेत करणार आहे.यामुळे कोल्हापूर येथील गंगावेश तालमीत वस्ताद पैलवान विश्वासराव हरगुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा कसुन सराव चालू आहे.आता निमगाव केतकी येथील संयोजकांनी विनंती केल्यावर पैलवान जयदिप पाटील याने आपण हरीयाणा केसरी पैलवान मलंग यांच्या विरुद्ध लढायला तयार आहे असे सांगितले.

जयदिप पाटील हा विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांचा पुतण्या होय.आमदार नारायण आबा पाटील यांचे धाकटे बंधू राजन (अण्णा) पाटील यांचा जयदिप हा चिरंजीव होय.तसं पाहिलं तर पाटील कुटूंबास कुस्तीची अलौकिक परंपरा लाभली आहे.आदिनाथ कारखान्याचे संस्थापक चेअरमन कर्मयोगी गोविंदबापु पाटील यांनी आपल्या थोरल्या चिरंजीवास म्हणजेच स्व.पै.श्रीराम भाऊ पाटील यांना कुस्तीसाठी कोल्हापूर येथील तालमीत ठेवले व तिथुन मग हा कुस्तीचा प्रवास सुरु झाला.

"विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी आपल्या जीवनातील ऐन उमेदीच्या काळातील एक दशकाहुन अधिक काळ हा लाल मातीत कुस्ती मेहनत करण्यात घालवला.कोल्हापूर येथील गंगावेश तालमीतच नारायण आबांनी कुस्तीचे धडे गिरवले,डावपेच शिकुन घेतले.अफाट मेहनत,कमालीची जिद्द व डावपेचातील कौशल्य या जीवावर आमदार नारायण आबा पाटील यांनी चार वेळा महाराष्ट्र कूस्तीगीर संघाची अधिवेशने गाजवली व चार वेळा ते महाराष्ट्र चॉम्पिअन ठरले.यावरच न थांबता त्यांनी ग्रीको रोमन या कुस्ती प्रकारात ७४ किलो वजन गटात भारतात प्रथम येऊन सुवर्ण पदक पटकावले.राष्ट्रीय सुवर्णपदकाचे ते मानकरी ठरले."

हा इतिहास मी का सांगत आहे तर याच पैलवान नारायण आबा पाटील आणि निमगाव केतकी येथील कुस्ती मैदानाचं एक अनोखं नातं आहे.निमगाव केतकीकरांनी पैलवान नारायण आबा पाटील यांचेवर खुप प्रेम केलं.इथल्या कुस्ती शौकीनांनी सात वर्षाहुन अधिक काळ पैलवान नारायण आबा पाटील यांना डोक्यावर घेतलं,त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.एक काळ तर असा होता की पैलवान नारायण आबा पाटील यांची कुस्ती हिच इथल्या कुस्ती शौकीनांसाठी जणु शेवटच्या इनामाची कुस्ती आहे असंच वाटायचं.पैलवान नारायण आबा पाटील यांना पहायला इंदापूर व आसपासच्या तालुक्यातील हजारो कुस्ती शौकीनांची गर्दी जमायची.आज तेच कुस्ती मैदान त्यांच्या पुतण्याने म्हणजेच पैलवान जयदिप पाटील याने गाजवले. *"इतिहास जणु परत एकदा गिरवला जातो आहे असाच हा क्षण होय.कारण निमगावकरांच प्रेम व त्यांनी दिलेलं प्रोत्साहन घेऊनच एकेकाळी पैलवान नारायण आबा पाटील यांनी देश जिंकला.देशपातळीवर या महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिलं आज पैलवान जयदिप पाटील हा त्याच दिशेने प्रवास करत आहे.काही महिन्यांवर हिंदकेसरी पदाची कुस्ती स्पर्धा येऊन ठेपली आहे.पैलवान जयदिप हा या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

काल निमगाव केतकी येथील ग्रामस्थांच्या कौतुकाची थाप व येथील श्री गणेशाचा आशीर्वाद जयदिप यास हिंदकेसरी होण्यासाठी बळ देणार हे निश्चितच आहे.अवघ्या महाराष्ट्राच लक्ष आता पैलवान जयदिप पाटील याच्या पुढील कुस्ती कडे लागून राहीले आहे.नेहमीच लाल मातीवर नितांत प्रेम करणाऱ्या पाटील कुटुंबाचा कुस्तीचा वारसा पुढे घेऊन जाताना आपल्या तालूक्याचा,जिल्ह्याचा व राज्याचा बहुमान वाढवण्याची जबाबदारी आता पैलवान जयदिप पाटील याचेवर येऊन पडली आहे.स्व.पैलवान श्रीराम भाऊ पाटील,राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते पैलवान आमदार नारायण आबा पाटील, डबल उप महाराष्ट्र केसरी तथा शिव छत्रपती पुरस्काराचे मानकरी माजी सभापती पै.अतुलभाऊ पाटील,कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान संग्राम पाटील यांचे पाठोपाठ आता पैलवान जयदिप पाटील नावाचं एक वादळ महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात धुमाकुळ घालत आहे.

"काल निमगाव केतकी येथील कुस्ती मैदानात पैलवान जयदिप पाटील याला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई महापौर केसरी विजेता पैलवान विजय गुटाळ हा आवर्जून उपस्थित होता.तर आपल्या चुलत बंधुची कुस्ती पाहण्यासाठी व त्याचे मनोबल वाढवण्यासाठी करमाळा तालूक्याचे आशास्थान व भविष्यातील आमदार तथा जेऊरचे विद्यमान सरपंच पैलवान पृथ्वीराज पाटील हे सुध्दा आवर्जून उपस्थित होते.पैलवान जयदिप पाटील याने काल निमगाव केतकी येथील कुस्ती मैदान गाजवून निमगावकर व पाटील कुटुंबाच यांचेतील कुस्तीच्या नात्याची वीण अधिक बळकट केली आहे.काल निमगाव करांना एकेकाळी ज्याला पाहण्यासाठी या मैदानावर गर्दी जमायची त्या पैलवान नारायण आबा पाटील यांच्या कुस्तीची नक्कीच आठवण झाली असणार..."

                     **** जाहिरात ******👇




येथील हजारो कुस्ती शौकीनांची मने जिंकून पैलवान जयदिप पाटील हा आता हिंदकेसरी पदाच्या दिशेने वाटचाल करत आहे.करमाळा मतदार संघातील तमाम कुस्ती शौकीनांकडून पैलवान जयदिप पाटील यास हिंदकेसरी स्पर्धेत यश मिळावे यासाठी खूप-खूप शुभेच्छा.!

-सुनील तळेकर (प्रवक्ते आमदार पाटील गट)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा