टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9922 419 159
शहाजीनगर ( ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने रौप्यमहोत्सवी चालू सन २०२५-२६ च्या ऊस गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन ३१०१ रुपये प्रमाणे उच्चांकी उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. सदरची ऊस बिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शुक्रवारी दि. ५ डिसेंबर रोजी जमा केली जाईल, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी दिली.
नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याच्या इतिहासामध्ये प्रथमच उच्चांकी अशी प्रति टन ३१०१ रुपये प्रमाणे उचल जाहीर केल्या बद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असून आज पर्यंतच्या इतिहासामध्ये कारखान्याने मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी एका दिवसात ६४०० मे. टन ऊसाचे गाळप करून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. या २५ व्या ऊस गळीत हंगामामध्ये सुमारे ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने कारखान्याची वाटचाल नियोजनबध्द सुरु आहे.
सद्य:स्थितीत कारखान्याला आर्थिक अडचण असताना देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून ३१०१ रुपये प्रमाणे
उच्चांकी उचल देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्ट पद्धतीने सुरू असून बुधवार दि. ३ डिसेंबर अखेर कारखान्याने २ लाख मे. टन ऊसाचे गाळप करीत १४५३०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा आजचा साखर उतारा १०.७० टक्के असून, सरासरी साखर उतारा १० टक्के एवढा आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी ३५०० मे. टन असून सध्या सरासरी ५७०० ते ५९०० मे. टन क्षमतेने ऊस गाळप सुरु आहे. कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून आज अखेर ७२३००४१ युनिट वीज एक्स्पोर्ट करण्यात आली आहे. इथेनॉलचे आजअखेर १६९०१०० लिटर उत्पादन झाले असून कारखान्याचे बायोगॅस, सेंद्रिय खत आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पुर्ण कार्यक्षमतेने सुरु आहेत. त्याबद्दल संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक यांचे सौ. भाग्यश्री पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
शेतकी विभागाच्या ऊस तोडणी कार्यक्रमानुसार गळीत हंगाम जोरात सुरू असून शेतकऱ्यांनी गुणवत्तेचा सर्व ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे, त्यामुळे चांगला ऊस दर देणे शक्य होईल, असेही अध्यक्षा सौ. भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, ॲड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ उपस्थित होते.
•चौकट:-
विना कपात ३१०१ रुपये प्रमाणे रक्कम शुक्रवारी जमा होणार-सौ.भाग्यश्री पाटील.
नीरा भीमा कारखान्यास चालू ऊस हंगामामध्ये दि. १५ नोव्हेंबर पर्यंत ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांची कोणतीही कपात न करता ३१०१ रुपये प्रमाणे होणारी ऊस बिलाची सर्व रक्कम शुक्रवार दि. ५ डिसेंबर रोजी बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याचे सौ.भाग्यश्री पाटील यांनी सांगितले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा