सहसंपादक--- डॉ, संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9922 419 159
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील शव विच्छेदन गृहातील
मृतदेह ठेवण्याचे शीतगृह गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे. मात्र उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सिद्धार्थ नामपल्ली यांनी मात्र शीतगृह दोन दिवसापुर्वी बंद पडल्याचे सांगून पत्रकार सुरेश जकाते यांच्या मृतदेहाची अवहेलना केली तसेच नातेवाईकांची देखील फसवणूक केली. शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी रात्री जेष्ठ पत्रकार सुरेश जकाते यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हा प्रकार उघडकीस आला. सुरेश जकाते यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह इंदापूर उपजिल्हा रूग्णालय शवागृहातील शीतगृहात ठेवण्यासाठी आणण्यात आला मात्र शीतगृह नादुरुस्त असल्याने सुरेश जकाते यांचे पार्थिव गाडीतून उतरून पोस्टमार्टम रूमच्या दारात दिड तास ठेवावा लागल्याने मृतदेहाला मृत्यु नंतर देखील यातना भोगाव्या लागल्या. सुरेश जकाते यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेच्या तसेच अधिकाऱ्यांच्या अनेक समस्यावर आपल्या लेखणीतून आवाज उठवला मात्र त्यांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांच्या पार्थिवाची अवहेलना झाली. यावेळी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, पत्रकार डॉ. संदेश शहा, संतोष आटोळे, निळकंठ मोहिते, कैलास पवार, मधुकर गलांडे, महेश स्वामी, काकासाहेब मांढरे, धनंजय कळमकर व इतर पत्रकारांनी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनास वारंवार संपर्क साधला मात्र उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. शेवटी राज्याचे कृषी मंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर अर्धा तासानंतर काही डॉक्टर्स फिरायला आल्यासारखे आले. त्यांना घटनेचे काहीही गांभीर्य नव्हते, त्यांच्या कडे शवागारातील असुविधेबद्दल काहीही समर्पक उत्तर नव्हते. विशेष म्हणजे भरत शहा यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुरेश जकाते यांचे पार्थिव नेहण्यापूर्वी संपर्क साधला असता त्यांना सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे उपस्थित पत्रकार व नातेवाईकांनी उपजिल्हा रूग्णालय सुविधेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
जाहिरात 👇
शुक्रवारी सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत जकाते यांचे पार्थिव पोष्टमार्टम रूमच्या दारात नाईलाजाने ठेवण्याची वेळ नातेवाईक यांच्यावर आली. त्यानंतर रूग्णालयाकडून शववाहिनी ॲम्ब्युलन्स बोलविण्यात आली, ती देखील नादुरूस्त होती. ती दुरूस्त करण्यासाठी पुन्हा पाऊण तास मृतदेहा सह ताटकळत बसण्याची वेळ पत्रकार, नातेवाईक व उपस्थित नागरिक यांच्यावर आली. त्यातच या शवागारासमोर लाईट नसल्याने सर्वांना अंधारात उभे राहावे लागले. किमान येथे लाईटची सुविधा तरी प्रशासनाने उपलब्ध करणे गरजेचे आहे.
या प्रकाराने उपस्थित नातेवाईकांना मोठा त्रास सोसावा लागला. त्यानंतर रात्री पावणेआठ वाजता शासकीय शववाहिनी अँम्बुलन्स दूरूस्त करून आणण्यात आली. त्यानंतर अँम्बुलन्स शव वाहिनीच्या शीतगृहात मृतदेह ठेवण्यात आला. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र अडीच तास पार्थिव अंधारात राहिल्यामुळे या प्रकारास जबाबदार वैद्यकीय अधिकार्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी होत आहे.
विशेष म्हणजे तीन महिन्यापूर्वी सुसज्ज नवीन शववाहिका इंदापूर उपजिल्हा रुग्णालयास मिळाली मात्र ती वापरत नाही. यासंदर्भात काही अडचण असल्यास उपजिल्हा रुग्णालयाने तत्काळ ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे. मानवी जीवन अनमोल आहे तसेच पुन्हा पुन्हा नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संवेदनशील असणे गरजेचे आहे असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा