*करमाळा-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
मागील आमसभा होऊन सहा महिने उलटुन गेले असतानाच आता तातडीने एका विशेष आमसभेचे नियोजन केले जावे अशी मागणी नागरिक आमदार नारायण आबा पाटील यांच्या कडे करत असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी दिली आहे. याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सन २०१९ ते २०२४ या कालावधीत नागरिकांचे अनेक प्रश्न प्रशासकीय विभागातील कार्यालयात सोडवले गेले नाहीत व जाणीवपूर्वक काही प्रश्न प्रलंबित असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी आमदार पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच एक आमसभा घेतली. या सभेत नागरिकांनी आपले प्रश्न मांडले तसेच अनेक शासकीय अधिकाऱ्यांकडून आपणास लाच मागितली गेली असल्याच्या तक्रारीही केल्या. परंतु हि आमसभा पार पडल्यानंतर मात्र काही विभागाकडून आमसभेतील जनतेच्या प्रश्नांची हेळसांड करुन आजही दुर्लक्षितच केल्याचे निदर्शनास आले आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे आमसभेचे सचीव असल्याने त्यांनी सर्वच विभागांना लेखी स्वरुपात कार्यवाही बाबत माहिती मागितली असताना काही विभागाकडून अद्यापही माहिती दिली गेली नसल्याचे लक्षात आले आहे. विशेषतः महसुल विभागास आमसभेच्या सचीवांनी माहिती मागुनही त्यास दाद दिली गेली नाही. याबाबत दोन स्मरणपत्र महसुल विभागास दिली गेली असल्याचे पुढे आले आहे. यामुळे आता सर्वच विभागांचा आढावा घेण्यासाठी एका विशेष आमसभेचे नियोजन केले जावे आणि या आमसभेतच अधिकाऱ्यांना जाब विचारुन कामचुकारपणा केल्याबाबत कारवाईच्या मागणीचे ठराव केले जावेत अशीही मागणी नागरिक व विविध गावच्या सरपंचाकडून होत आहे. यामुळे आता तातडीने एका आमसभेचे नियोजन करता येते का याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे सल्ला मागण्यात येणार आहे. आमदार नारायण आबा पाटील यांनी आमसभेतील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी वेगवेगळ्या विभागाची स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचा शब्द नागरिकांना आमसभेत दिला होता. त्यानुसार मागिल काही दिवसांपूर्वी अधिवेना अगोदर जेऊर ता करमाळा येथे महावितरणची एक आढावा बैठक आमदार नारायण आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस बार्शी येथील विभागीय कार्यालय प्रमुख कार्यकारी अभियंता श्री मगर साहेब यांचेसह सर्वच अधिकारी उपस्थित होते. त्याप्रमाणे आता महसुल, कृषी, सार्वजनिक बांधकाम, पुनर्वसन, भुमापन, आरोग्य आदि विभागांच्या स्वतंत्र बैठकी घेता येतील अथवा विशेष आमसभेचे नियोजन करता येईल याबद्दल लवकरच एक निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी दिली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा