*संपादक --हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
मुंबई : मुंबईसह २९ महापालिकांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मुंबईत भाजपाला ८९ तर एकनाथ शिंदेंच्या पक्षाला २८ जागा मिळाल्या आहेत. महायुतीचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. मुंबईत भाजपाचा महापौर होऊ नये ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील शिवसैनिकांचीही इच्छा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच नगरसेवक संपर्कात असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
ज्यांनी स्वतःचे शिवसेनेचे आमदार फोडले त्यांना आता नगरसेवक फुटतील अशी भीती वाटत असेल तर आश्चर्याची गोष्ट आहे. आमदारांना त्यांनी सुरतला ठेवलं आणि नगरसेवकांना इथे कोंडून ठेवलं आहे. त्यांच्यासाठी सुरक्षित जागा ही खरंतर सुरत आहे. त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीचीही भीती वाटते आहे. जिथे मुख्यमंत्री भाजपाचे आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तरीही त्यांना वाटत असेल की आपले नगरसेवक फोडले जातील, पळवले जातील असं वाटत असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणातली ही हास्यजत्रा आहे. नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक आहेत ते शिवसेनेचे आहेत. त्यांच्या मनातही मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल धगधगते आहे. भाजपाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळ जवळ सगळ्यांनी ठरवलं आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
शिवसैनिकांच्या मनात वेगळी भावना आहे…
निवडून आलेले जे नगरसेवक आहेत, ते मूळचे शिवसैनिक आहेत. जो शिवसैनिक असतो त्याच्या मनात शिवसेनेबाबत वेगळी भावना आहे. भाजपाचा महापौर होऊ नये हे त्यांच्या मनात आहे हे आम्हाला समजलं आहे. कुणी कितीही कोंडून ठेवलं तरीही इतकी साधनं असतात संपर्काची, दळणवळणाची त्यानुसार संदेश येत असतात. मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचा किंवा शिवसेनेचा व्हावा यापेक्षा भाजपाचा होऊ नये अशी एकनाथ शिंदेंसह असलेल्यांचीही इच्छा आहे. देवाची इच्छा असेल तर महापौर बसू शकतो. मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचीही चर्चा झाली. आम्ही तटस्थपणे सगळ्या हालचालींकडे पाहात आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. आम्ही महापौरपदावर दावा केला आहे असं नाही. जे काही आकडे आहेत ते जवळजवळ सारखे आहेत. भाजपा हा जगातला मोठा पक्ष आहे पण त्यांना चारचंच बहुमत मिळालं. शिवाय बहुमत कितीही मोठं असलं तरीही बहुमत हे पाऱ्यासारखं चंचल असतं.
महायुतीचा महापौर बसणार असता तर…
महायुतीचा महापौर बसणार असता तर २९ नगरसेवक कोंडले नसते, यावर आमच्या देवाभाऊंचं काय म्हणणं आहे? देवेंद्र फडणवीस दावोसला गेले आहेत, पण काय गुंतवणूक वगैरे काही दिसत नाही. दावोसला बसूनही ते महापालिकेचं राजकारण करणार आहेत त्यापेक्षा इथे बसून दावोसच्या गोष्टी करा. देवेंद्र फडणवीस यांना हे मान्य होईल का की अमित शाह यांच्या पक्षाचा महापौर व्हावा? मी जे काही देवेंद्र फडणवीसांना ओळखतो ते वेताळाप्रमाणे हट्टी आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नगरसेवक जर लपवून ठेवावे लागत असतील तर कायदा सुव्यवस्थेचं राज्य नाही हे एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना कृतीतून दाखवू दिलं आहे असंही संजय राऊत म्हणाले. मुंबईचा महापौर शिवसेनेचा, डुप्लिकेट शिवसेनेचा नाही. पण अमित शाह यांना त्यांचा माणूस महापौरपदी बसवायचा आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना ते मान्य नाही असंही राऊत यांनी म्हटलं आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा