करमाळा-- प्रतिनिधी
टाइम्स 45 न्यूज मराठी
महाराष्ट्र डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी पत्रकार दिनेश मडके यांची पुनश्च निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य राजा माने यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच ते सात वर्षांच्या कालावधीत दिनेश मडके यांनी करमाळा तालुक्यात संघटनात्मक बांधणी करत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकत तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
ही निवड पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीत जाहीर करण्यात आली. बैठकीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, प्रदेश उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण नागणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, राज्य संघटक मुरलीधर चव्हाण, कोषाध्यक्ष अमित इंगोले यांच्यासह गणेश शिंदे, शशांक शिंगाडे, धीरज शेळके, माढा तालुका अध्यक्ष विजय चव्हाण, अंकुश आतकर तसेच जिल्हा, तालुका व राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिनेश मडके यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याचा गौरव करत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शासनमान्यता दिली असून, यासंदर्भातील प्रक्रिया केंद्र व राज्य शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. डिजिटल मीडिया पत्रकारितेला अधिकृत अधिमान्यता मिळवून देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे असून, त्यांच्या दूरदृष्टीतूनच डिजिटल पत्रकारांच्या न्यायाचा मार्ग अधिक सक्षम झाला असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत पत्रकारांना शासकीय सोयी-सवलती, संरक्षण व अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी संघटना सातत्याने कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. पत्रकारांच्या हक्कांसाठी व सुरक्षिततेसाठी संघटना कटिबद्ध राहील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पुनश्च निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना तालुकाध्यक्ष दिनेश मडके म्हणाले, “प्रिंट मीडियाप्रमाणेच डिजिटल मीडियालाही शासनाच्या जाहिराती, अधिस्वीकृती व अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहील. पत्रकार सुरक्षा विमा, कुटुंब कल्याण योजना, पेन्शन यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ डिजिटल पत्रकारांना मिळवून देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला जाईल.”
ते पुढे म्हणाले की, पत्रकारांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत केली असून, पत्रकार कुटुंबांसाठी दहा लाख रुपयांच्या विम्याची तरतूद करण्यात आली आहे.
डिजिटल मीडिया पत्रकारांची अधिकृत नोंदणी करून त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी संघटना कार्यरत राहणार असून, आगामी काळात प्रशिक्षण कार्यशाळा, मेळावे व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच लवकरच करमाळा तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांनी दिली.
टाइम्स 45 न्यूज मराठी अकलुज --संपादक हुसेन मुलाणी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा