मुख्य संपादक टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:+9730867448
आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाची चुकून दानपेटीत पडलेली सोन्याची अंगठी परत न मिळाल्याने तुळजापूरमध्ये खळबळ उडाली असून, मंदिर संस्थानच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या वतीने दिनांक 21 जानेवारी रोजी तहसीलदार तथा मंदिर संस्थान प्रशासनाकडे अधिकृत निवेदन देत न्यायाची मागणी करण्यात आली आहे
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की पुणे येथील रहिवासी श्री. टिंगरे सुरज कृष्णा रा. पुणे हे भाविक दिनांक 19 ऑक्टोंबर २०२५ रोजी कुटुंबासह तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर आरतीच्या वेळी दानपेटी क्रमांक १२ मध्ये देणगी टाकताना त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी अनवधानाने दानपेटीत पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही अंगठी ही कोणत्याही प्रकारे दान म्हणून दिलेली नसून, चुकून हातातून निसटून दानपेटीत पडल्याचा स्पष्ट दावा संबंधित भाविकांनी केला आहे.
या घटनेनंतर श्री. टिंगरे यांनी तत्काळ मंदिर संस्थानकडे लेखी अर्ज सादर करून अंगठी परत देण्याची विनंती केली. यासोबतच त्यांनी अंगठी आपलीच असल्याचे पुरावे, खरेदीची पावती व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचीही तयारी दर्शवली होती. मात्र, मंदिर संस्थानच्या वतीने दि. ०३ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या विश्वस्त मंडळाच्या ठरावाचा आधार घेत, सदर अंगठी परत करता येणार नसल्याचे लेखी उत्तर देण्यात आले.
मंदिर संस्थानच्या या भूमिकेमुळे भाविकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. “दानपेटीत पडलेली प्रत्येक वस्तू ही दानच समजावी” हा नियम मान्य असला, तरी जर एखादी वस्तू चुकून पडली असेल आणि ती वस्तू संबंधित भाविकाचीच असल्याचे स्पष्ट पुराव्यांनिशी सिद्ध होत असेल, तर मानवी दृष्टिकोनातून त्या वस्तूची परतफेड करणे योग्य ठरेल, अशी भावना अनेक भाविकांमधून व्यक्त होत आहे.
या संदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंदिर संस्थानने जर या प्रकरणात संवेदनशीलता दाखवून योग्य चौकशी करून अंगठी परत केली, तर संस्थानचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. उलट, तुळजाभवानी मातेच्या मंदिराबाबत भाविकांमध्ये विश्वास, आदर व श्रद्धा अधिक दृढ होईल.
समितीने आपल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, जर एखाद्या भाविकाकडून अनवधानाने सोन्याची अंगठी किंवा इतर मौल्यवान वस्तू दानपेटीत पडली आणि ती वस्तू त्याच भाविकाची असल्याचे सिद्ध झाले, तर अशा प्रकरणांमध्ये नियमांपेक्षा न्याय, नैतिकता आणि मानवी भावना यांना प्राधान्य दिले गेले पाहिजे.
दरम्यान, या घटनेमुळे तुळजापूर मंदिर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात अशा प्रकारच्या घटनांमध्ये अधिक पारदर्शक व सहानुभूतीपूर्ण निर्णय अपेक्षित असल्याचे मत स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि भाविकांनी व्यक्त केले आहे.
या प्रकरणात तहसीलदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून मध्यस्थी करावी, तसेच मंदिर संस्थानने आपली भूमिका पुनर्विचारात घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात अशा घटनांमुळे मंदिर संस्थानची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही समितीने दिला आहे.
आई तुळजाभवानीच्या भक्तांसाठी हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून श्रद्धेचे व विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे या प्रकरणात न्याय्य व भावनिक दृष्टिकोनातून तोडगा काढण्यात यावा, हीच अपेक्षा भाविक वर्गातून व्यक्त होत आहे.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांचे स्वाक्षरी आहे .






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा