Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ११ जानेवारी, २०२६

मकर संक्रांतीच्या सणानिमित्त परिसरातील गावात व आठवडे बाजारात ओवसाच्या साहित्य, सुगडी, हळदी - कुंकू व बांगड्याची दुकाने थाटली

 *कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*


   मकर संक्रांतीच्या सणानिमित्त परिसरातील गावात व आठवडे बाजारात ओवसाच्या साहित्य, सुगडी, हळदी - कुंकू व बांगड्याची दुकाने थाटली आहेत. बाजारपेठेत आर्थिक विवंचनेने महिलांत निराशेचे वातावरण पहावयास मिळते आहे. 

     अकलूज, बावडा, पिंपरी बुद्रुक, वडापूरी, नरसिंहपूर आदि ठिकाणच्या बाजारपेठत मागील पंधरा दिवसांपासून बांगडी, सुगडी, चुड्या, पाटल्या, महिलांच्या सौंदर्याचे साहित्य खरेदीसाठी महिलांची तुरळक उपस्थिती दिसत आहे. तर मागील आठ दिवसांपासून गावोगावच्या आठवडा बाजारात सुगडी विक्रीसाठीची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत



      मकर संक्रांतीसाठी लागणारी सुगडी कुंभारवाड्यात दोन ते तीन लाख बनवून तयार करण्यात आली आहेत. संक्रांतीसाठी सुगडी ही महत्त्वाची वस्तू असते. गावगावच्या कुंभारवाड्यात आता मातीकाम करणारे कारागीर बोटावर मोजण्याइतकेच राहिले आहेत. त्यामुळे सणावारांना लागणाऱ्या मातीच्या वस्तू आता मिळणे कठीण होत चालले आहे. या वस्तू बनवण्यासाठी लागणारी मातीसुद्धा आता उपलब्ध होत नाही. नरसिंहपूर परीसरातील गणेशवाडी, सराटी, गिरवी येथील कुंभारवाड्यात दहा ते पंधरा कारागीर ही कामे करत आहेत. येथील कारागिरांनी पारंपरिक पद्धतीने संक्रांतीची मातीची सुगडी बनविण्याच्या व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून सुगडी बनविण्याच्या कामाला सुरुवात केली होती. या कुटुंबीयांनी आतापर्यंत सुमारे अडीच ते तीन लाखांहून जास्त सुगडी तयार केल्या आहेत.



   गिरवी येथील कारागीर चिंतामणी कुंभार व कुटुंबीयांनी बनवलेली सुगडी अकलूज, पिलीव, नातेपुते, बावडा, पिंपरी बुद्रुक, नरसिंहपूर याठिकाणी होलसेल भावात विक्रीसाठी जातात. पूर्वी चाकावर एक कारागीर दिवसाला ६०० ते ७०० सुगडी बनवायचा, आता तो यंत्राच्या साह्याने दिवसाला एक हजारहून जास्त सुगडी बनवत आहेत. यंदा मातीचे दर वाढल्याने मागील वर्षाच्या तुलनेने सुगड्यांच्या दरात वाढ झाली आहे, असे सुगड्या बनविणारे पिठेवाडी येथील कारागीर दादा कुंभार यांनी सांगितले.





    तर हळदी, कुंकूच्या दरात थोडासा फरक पडला असल्याचे हसन अत्तार (बावडा) यांनी सांगितले. तर चुड्या व पाटल्याची विक्रीही सध्या जेमतेमच असून साधे ३० रूपये तर भिंगाच्या ४० रूपये जोडी विकली जात असल्याचे मुजमिल तांबोळी (बावडा) यांनी सांगितले. 

फोटो - बावडा येथील आठवडी बाजारात संक्रांतीच्या साहित्य विक्रीची दुकाने थाटली.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा