*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर
8378081147*
बावडा- नरसिंहपूर रस्त्यावरून उस वाहतूक करणाऱ्या वाहनांना परावर्तक (रिफ्लेक्टर) नसल्यामुळे रात्रीच्या अपघातात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिस व परीवहन विभागाने वाहनांना रिप्लेक्टर सक्तीची करण्याची मागणी परिसरातील विद्यार्थी, नागरिकांसह वाहनधारकांनी केली आहे.
इंदापूर तालुक्यातील ऊसाची सहकार महर्षी साखर कारखाना, बारामती ॲग्रो, कर्मयोगी साखर कारखाना, निरा भीमा सहकारी साखर कारखाना, विठ्ठलराव शिंदे सहकारी, दि सासवड माळी कारखाना आदींसह अनेक कारखान्यांची उसाची वाहने वाहतूक करीत आहेत. परंतु या वाहनांना मागील बाजूस कापडी रिप्लेक्टर लावण्याची आवश्यकता असताना ते लावले जात नाहीत. रात्रीच्या वेळी उसाची धोकादायक वाहतूक करणाऱ्या ट्रेलरला कापडी रिप्लेक्टर लावल्यानंतर तो रिप्लेक्टर पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकाच्या त्वरित लक्षात येतो. त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होते.
सध्या ऊस वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांवर रिप्लेक्टर नसल्यामुळे रात्रीच्या वेळी उसाने भरलेले वाहन पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकाला दिसत नाही. रात्रीच्या वेळी उसाच्या वाहनाच्या पाठीमागून दुचाकी किंवा चारचाकी गाडी येत असेल व समोरून येणाऱ्या वाहनांच्या दिव्याचा प्रखर प्रकाश वाहनचालकांच्या डोळ्यावर पडल्यानंतर त्याला पुढे असलेले उसाचे वाहन दिसले नसल्याने वाहनाला अपघात होऊन विपरीत घडत आहे.
ऊसाच्या वाहनांवर अल्पवयीन, लायसन्स नसलेले मुले ड्रायव्हर म्हणून काम करत असतात. यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसल्याने रस्ते वाहतूक नियम पाळले जात नाहीत. दिवस रात्र ट्रॅक्टर मधील टेपचा आवाज कर्ण कर्कशपणे सोडून वाहने चालवली जातात. रस्त्यावर असलेली गावे, शाळा यांचा कोणताही विचार केला जात नाही. नियमांचे पालन करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. पोलिस व परीवहन विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
टेपरेकॉर्डर असणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाईची आवश्यकता
ऊस वाहतूक करणारे वाहनचालक मोठ मोठ्या आवाजात ट्रॅक्टरमधील टेपरेकॉर्डर लावून उसाने भरलेले वाहन बेजबाबदारपणे चालवतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता असते. तसेच रस्त्यावरील गाव, शाळा व मंदिराजवळून जातानाही आवाज कमी केला जात नाही. तरीसुद्धा अशा वाहनांकडे पोलिस व परीवहन विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे, रिफ्लेक्टर नसणाऱ्या तसेच ट्रॅक्टरवर टेपरेकॉर्डर असणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्यास अपघातांना आळा बसण्यास मदतीचे होईल.
रस्त्यावर थांबणाऱ्या बैलगाड्या धोकादायक
बैलगाडीतून उसाची वाहतूक करणारे मजूर उसाने भरलेली बैलगाडी पंक्चर झाल्यानंतर रस्त्यावरच उभी करतात. रात्रीच्या वेळी अशा पंक्चर झालेल्या बैलगाड्या वाहनचालकांना दिसत नाहीत. त्यामुळे देखील अपघात होतात. बैलगाड्यांना देखील रिप्लेक्टर बसवण्याची आवश्यकता आहे.
फोटो - बावडा नरसिंहपूर मार्गावर रिप्लेक्टर नबसवता धोकादायकपणे सुरू असलेली वाहतूक अपघाताला आमंत्रण ठरत आहे.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा