Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १८ जानेवारी, २०२६

*समरसता साहित्य परिषद समाजजागृतीचे प्रभावी माध्यम – दिनेश मडके*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*



समरसता साहित्य परिषदेच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य प्रभावीपणे सुरू असून समाजाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम परिषद सातत्याने करीत आहे, असे प्रतिपादन समरसता साहित्य परिषदेचे सोलापूर जिल्हा सहकार्यवाह तसेच करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांनी केले.



ते वडशिवणे (ता. करमाळा) येथे समरसता साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. गणेश पवार हे होते. यावेळी व्यासपीठावर मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गोरख आप्पा जगदाळे, समरसता साहित्य परिषदेचे करमाळा तालुका प्रतिनिधी, कवी व लेखक सोमनाथ टकले आदी मान्यवर उपस्थि

दिनेश मडके पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक, प्रशासकीय व लोककल्याणकारी कार्य आजच्या पिढीसाठी दिशादर्शक आहे. न्यायप्रिय, कर्तव्यदक्ष आणि सर्वसमावेशक प्रशासनाचे आदर्श त्यांनी घालून दिले. त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, नव्या पिढीपर्यंत त्यांचा वारसा पोहोचावा या उद्देशाने समरसता साहित्य परिषद विविध साहित्यिक व सामाजिक उपक्रम राबवित आहे. महाराष्ट्र प्रदेश सहकार्यवाह  सुहास घुमरे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष जगन्नाथ हुक्केरी पिंपरी चिंचवड अध्यक्षा मानसी चिटणीस, सोलापूर जिल्हाध्यक्ष माधव कुलकर्णी  यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे.

निबंध स्पर्धेसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती विकसित होते, सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते तसेच राष्ट्रभक्ती व मूल्याधिष्ठित जीवनाची प्रेरणा मिळते, असेही मडके यांनी नमूद केले. समरसता साहित्य परिषदेच्या माध्यमातून नवोदित लेखक, कवी यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन सक्षम आणि संवेदनशील साहित्यिक घडविण्याची ही एक व्यापक चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात डॉ. भगवंत गणेश पवार यांनी यूपीएससी परीक्षेत संपूर्ण भारतातून २३ वा क्रमांक मिळवून वैद्यकीय क्लास वन अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. समरसता साहित्य परिषदेच्या वतीने त्यांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरातील तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक कु. ज्ञानेश्वरी शिवाजी पराडे व द्वितीय क्रमांक कु. हर्षाली हनुमंत व्हरे यांनी मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ह.भ.प. गणेश पवार यांनी समरसता, सामाजिक एकोपा व सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी साहित्य चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले. समाजपरिवर्तनासाठी साहित्य हे प्रभावी आणि दीर्घकालीन परिणाम करणारे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समरसता साहित्य परिषदेचे प्रतिनिधी सोमनाथ टकले यांनी केले. या कार्यक्रमास शिवाजी पराडे, जनार्दन राऊत यांच्यासह साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा