*कार्यकारी --संपादक*
*एस.बी.तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:--8378081147*
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. शासकीय यंत्रणा कामाला लागली असताना मात्र इंदापूर तालुक्याच्या राजकारणाचे केंद्र बिंदू असणारे बावडा लुमेवाडी गटात कधी नव्हती एवढी वादळा पुर्वीची शांतता दिसून येत आहे. कार्यकर्ते व पदाधिकारी गायब झाल्याने सर्वसामान्य मतदार राजा मात्र बुचकळ्यात पडल्याचे पहावयास मिळत आहे. तर गावोगावच्या पारावरच्या गप्पाही थंडावल्याचे दिसत आहे.
इंदापूर तालुक्यातील बावडा लुमेवाडी (पुर्वाश्रमीचा बावडा नरसिंहपूर) जिल्हा परिषद गट परंपरेने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या सुरुवाती पासूनच तालुक्याचे व जिल्ह्याचे लक्ष या गटाकडे लागून राहत असते. परंतू यावेळी मात्र निवडणूका जाहीर होवून चार दिवस उलटले असून तीन दिवसांपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कोणती चर्चा ना जोर ना बैठका संपूर्ण गटात स्मशान शांतता पसरली आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारण़ाचे केंद्रात हालचाल थंडावल्याने मतदार व नागरिकांत उलट सुलट चर्चांना ऊत आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार हे दोन्ही पक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणूका एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील परंपरेचे विरोधकांना एकत्र प्रचार करावा लागण्याच्या शक्यतेने मोठी खळबळ माजली आहे. मतदार व नागरिकांत यासंदर्भात मोठ्या प्रमाणात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या असून खऱ्या अर्थाने दोन विरोधकांचे व मतदार व नागरिकांचे मनोमिलन होणार का?
इंदापूर तालुक्याचे आमदार व कृषीमंत्री दत्तात्रय भरणे तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेसह पदाधिकाऱ्यांचे जरी मनोमिलन वरीष्ठांच्या आदेशाने झाले असले तरी मात्र कार्यकर्ते, मतदार व नागरिकांत अद्यापही दुरावाच दिसत आहे. त्यामुळे याचा फटका उमेदवारांना बसण्याच्या शक्यतेने सर्वचजण धास्तावल्याचे चित्र दिसत आहे.
स्थानिक पातळीवर मागील वीस - पंचवीस वर्षापासून नेत्यांच्या राजकीय कारकीर्दी टिकवण्या करीता स्वताचे संसार लयाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्ष मनोमिलनामुळे मोठा फटका बसणार असल्याने पक्षनेतृत्वाला हिसका दाखवण्याची तयारी कार्यकर्त्यांनी गुप्त बैठकातून सुरू केल्या आहेत. यातून अनपेक्षित असे निकाल लागणार असेच एकंदर दिसत आहे.
दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशीच काहीशी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र या मनोमिलनाचा फटका मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यातून काही अनपेक्षित असे धक्कादायक निकालही बाहेर येण्याची शक्यता दबक्या आवाजात कार्यकर्त्यांमधून बोलली जात आहे. तर भाजपा नेते प्रवीण माने व नुकतेच प्रवेश केलेले प्रदीप गारटकर संयुक्तपणे पूर्ण ताकतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने मोठी रंगत निर्माण झाली आहे. इंदापूर तालुक्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
---------------------------





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा