Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

लवंग जि.प.शाळेचे मुख्याध्यापक सादिक काझी सर यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार समारंभ संपन्न.

 उपसंपादक- नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी



माळशिरस तालुक्यातील जि.प.शाळा लवंग सेक्शनचे मुख्याध्यापक सादिक काझी सर यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळाची यशस्वी पूर्णता करत सेवापूर्ती घेतली.या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते काझी सरांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.




         वर्गखोलीतून जीवनाची दिशा दाखवणारे,शिस्तीतून संस्कार रुजवणारे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशात स्वतःला विसरून काम करणारे काझी सर म्हणजे लवंग शाळेचा जिवंत इतिहासच.चॉक-डस्टने पांढरे झालेले हात आणि काळजीने भरलेले शब्द आज असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दीपस्तंभासारखे उभे आहेत. शाळेच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय,विद्यार्थ्यांसाठी वाहिलेला प्रत्येक क्षण आणि शिक्षक सहकाऱ्यांशी जपलेला आपुलकीचा धागा आज सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला.कार्यक्रमात उपस्थित अनेकांनी आपल्या भावना शब्दांत मांडताना काझी सरांच्या कार्याप्रती कृतज्ञतेचा सूर व्यक्त केला.मनोगतात काझी सरांनी सहकारी शिक्षक,विद्यार्थी,पालक व ग्रामस्थांचे आभार मानताना,“ही शाळा केवळ माझे कार्यक्षेत्र नव्हे, तर माझे कुटुंब होते” असे भावूक शब्द उच्चारले.शिक्षणरूपी दिवा उजळवत अनेक पिढ्यांचे भविष्य घडवणाऱ्या काझी सरांना शाळेच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.त्यांचे कार्य,त्यांची शिकवण आणि त्यांचे संस्कार लवंग शाळेच्या प्रत्येक पायरीवर सदैव जिवंत राहतील.

          सत्काराला उत्तर देताना सत्कार मूर्ती सादिक काझी सर यांनी आपणास सर्वाकडून खूप प्रेम मिळाले असून आपण नेहमीच सर्वांचे ऋणी राहू असे सांगीतले.सर्व उपस्थितांनी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

               यावेळी खा.धैर्यशील मोहिते पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील,गटशिक्षण अधिकारी सुषमा महामुनी,माजी विस्तार अधिकारी श्रीमती सायरा मुलाणी,श्रीमती महादेवी गुंड, शिवलिंग नकाते, पेन्शनर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुधीर नाचणे,पेन्शनर शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीमंत गुंड,सोलापूर जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संभाजी फुले,माजी अध्यक्ष विठ्ठल काळे, संगम व अकलूज केंद्राचे केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.हा कार्यक्रम कृष्णप्रिया हॉल अकलूज येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास उरवणे यांनी केले तर कु.समीना काझी यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा