*अकलूज प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक २९ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत मौजे चौंडेश्वरवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या शिबिराअंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्वच्छता, महिला मेळावा,आरोग्य तपासणी शिबिर,पशुचिकित्सा शिबिर, जलसंधारणासाठी बंधाऱ्याची उभारणी,स्मशानभूमी स्वच्छता, वृक्षदिंडी,वृक्षारोपण,हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.
या शिबिरात महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सयाजीराजे मोहिते पाटील, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.राजेंद्र वडजे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर,साहित्यिक प्रशांत सरूडकर,प्रा.महादेव तळेकर,डॉ.अपर्णा मुळे,प्रा.धनंजय देशमुख,डॉ.अनिल लोंढे आदी वक्त्यांनी शिबिरार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.या शिबिरात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी भेट दिली.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,"जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे,त्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करीत रहा. जीवनात आनंदी राहण्यासाठी कोणता तरी एक छंद किंवा कला जोपासणे गरजेचे आहे".
या शिबिराचा समारोप समारंभ आज संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. विश्वनाथ आवड हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून अकलूज पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक करिष्मा वणवे या उपस्थित होत्या. याप्रसंगी मौजे चौंडेश्वरवाडीच्या सरपंच सौ.अलका इंगवले देशमुख, उपसरपंच प्रशांत मोहिते,बाळासाहेब देशमुख,शिवाजीराव इंगवले देशमुख,संताजीराव माने देशमुख, डॉ.बाळासाहेब मुळीक,प्रा.स्मिता पाटील,प्रा.एकनाथ बोडके, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक करिष्मा वनवे आपल्या मनोगतात म्हणाल्या की," विद्यार्थी जीवनात आयुष्याचा पाया घडवण्यासाठीचे संस्कार या स्वरूपाच्या शिबिरामधून दिले जातात. हे क्षण जीवनात कधीच विसरले जात नाहीत.यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निश्चित करा व प्रयत्नपूर्वक ते मिळवा".डॉ.विश्वनाथ आवड यांनी विद्यार्थ्यांना रचनात्मक कामाचे महत्त्व स्पष्ट करून,शिबिरातून विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या संस्कार शिदोरीचे कौतुक केले.शिवाजीराव इंगवले देशमुख यांनी मोहिते पाटील परिवार व अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाने संपूर्ण परिसरात केलेल्या भरीव कार्याचा आढावा घेतला. सायली मदने व सत्यजित देशमुख या शिबिरार्थीची मनोगते झाली.
कार्यक्रमाधिकारी प्रा.दत्तात्रय मगर यांनी प्रास्ताविक केले.डॉ. विजयकुमार शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.सज्जन पवार यांनी आभार मानले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा