*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा - टेंभुर्णी - करमाळा - अहिल्यानगर या मार्गावर शहरालगत असलेल्या श्रीदेवीचामाळ बायपास चौकात सध्या वाहतुकीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. चारही बाजूंनी येणाऱ्या वाहनांची प्रचंड वर्दळ आणि अर्धवट अवस्थेतील उड्डाणपूल यामुळे हा चौक अपघाताचा 'ब्लॅक स्पॉट' ठरत असून, येथे तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे.
श्रीदेवीचामाळ चौक हा केवळ शहराचा बायपास नसून तो महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मुख्य दुवा आहे. अहिल्यानगर-टेंभुर्णी या मार्गावरून अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. करमाळा-श्रीदेवीचामाळ दिशेने बार्शी, कुर्डुवाडी, तुळजापूर, लातूर, धाराशिव आणि सोलापूरकडे जाणारी वाहने याच चौकातून जातात. संगोबा येथील श्री आदिनाथ महाराज मंदिराकडे ये - जा करणारे भाविक याच रस्त्याचा वापर करतात. संगोबा रस्त्यावरील साखर कारखान्याला जाणारी ऊस वाहतूक आणि इतर वाहने याच मार्गाचा अवलंब करतात.
श्रीदेवीचामाळ येथे प्रसिद्ध श्री कमलाभवानी माता मंदिर असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. तसेच, परिसरातील नागरी वसाहती, शाळांमुळे नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांचा वावर या चौकात मोठ्या प्रमाणात असतो. या ठिकाणी वेगवान वाहनांमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे.
दरम्यान सदरच्या ठिकाणच्या उड्डाणपुलाचे काम सध्या अर्धवट स्थितीत बंद आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला असून चालकांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून चारही बाजूंनी येणाऱ्या रस्त्यांवर शास्त्रोक्त पद्धतीने गतिरोधक आणि सूचना फलक लावणे गरजेचे आहे. येथील वाढती रहदारी पाहता प्रशासनाने तातडीने गतिरोधक बसवावेत, जेणेकरून नागरिक, शाळकरी मुले आणि भाविकांचा प्रवास सुरक्षित होईल.
रॉंग साईड धोकादायक
सदर चौकात अचानकपणे चुकीच्या पद्धतीने रॉंग साईडने वाहने चालविणारांचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः टें्भूर्णी बाजुने येऊन श्रीदेवीचामाळ रस्त्याकडे जायचे असल्यास आणि श्रीदेवीचामाळ रस्त्याकडून येऊन अहिल्यानगरकडे जायचे असल्यास अनेकजण पुलाला वळसा घालण्याऐवजी रॉंग साईडने अर्थातच चुकीच्या बाजुने वाहने पुढे घेवून जातात. अचानकपणे अशी वाहने आल्यावर योग्य पद्धतीने वाहने चालविणारांनाही अपघाताच्या धोकादायक प्रसंगाना तोंड द्यावे लागते. याशिवाय सातत्याने वाद होताना दिसतात. याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे
दिशादर्शक फलकांची आवश्यकता
सदर चौक हा सतत वाहतुकीच्या मार्गावरील आहे. या ठिकाणी करमाळा शहर, अहिल्यानगर रस्ता, सोलापूर, टें्भूर्णी रस्ता, कुर्डुवाडी -बार्शी - धाराशिव रस्ता दिशा दाखविणाऱ्या फलकांची आवश्यकता आहे. फलक नसल्यामुळे नवीन चालक गोंधळून जातात.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा