Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १८ जून, २०२६

*'उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन* *पुण्यात ओमराजेंना भेटण्यासाठी गेलो, पण.....* *आमदार कैलास पाटलांनी" सांगितली इनसाइड स्टोरी*

 

*मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*



 : उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. मागील दोन दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 'ऑपरेशन टायगर' राबवण्यात येत असल्याची चर्चा आहे.'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटल्याचं बोललं जात आहे. हे ६ बंडखोर खासदार लवकरच स्वतंत्र गट स्थापन करण्याच्याही हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून (ठाकरे) सर्व खासदारांसाठी 'पक्षादेश' (व्हिप) जारी करण्यात आला होता. सर्व खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, ठाकरे गटाच्या संसदीय दलाच्या या बैठकीला केवळ ३ खासदार उपस्थित राहिले, तर ६ खासदार अनुपस्थित‍ राहिले आहेत. त्यामुळे आता अनुपस्थित‍ राहिलेल्या खासदारांना पक्षाकडून नोटीस बजावली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने सहा बंडखोर खासदारांपैकी सर्वाधिक चर्चा ही धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची होत आहे. कारण ओमराजे निंबाळकर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं बोललं जात आहे. मात्र, ओमराजे निंबाळकर यांनी पक्षाची साथ सोडू नये, म्हणून त्यांची मनधरणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांना पुण्यात ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी पाठवलं होतं. मात्र, ओमराजे निंबाळकर यांची भेट होऊ शकली नसल्याची माहिती स्वत: आमदार कैलास पाटील यांनी दिली. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

कैलास पाटील काय म्हणाले?

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याची चर्चा आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी महत्वाचं भाष्य केलं. कैलास पाटील म्हणाले की, “ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणार की नाही? याबाबत अजून अस्पष्टता आहे. मात्र, ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जात आहेत ही अफवा ठरावी, अशी माझी भावना आहे. तसेच धाराशिवमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्ष एकसंघ राहावा आणि आम्ही कायम उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहावं अशी माझी इच्छा आहे.”

ओमराजे निंबाळकर यांच्याशी काही संपर्क झाला का? या प्रश्नावर बोलताना आमदार कैलास पाटील यांनी सांगितलं की, ” माझं आणि ओमराजे निंबाळकर यांचं परवा एका केसच्या तारखेच्या संदर्भात बोलणं झालं होतं. त्यानंतर मी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांच्याशी माझा संपर्क होत नाहीये. पण मी लवकरच त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहे”, असं कैलास पाटील यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंकडून ओमराजे निंबाळकरांच्या मनधरणीसाठी प्रयत्न

“ओमराजे निंबाळकर यांना भेटण्यासाठी पुण्यात गेलो होतो. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतरच मी पुण्यात ओमराजे निंबाळकर यांना भेटण्यासाठी गेलो. मात्र, ओमराजे निंबाळकर यांच्याशी माझी भेट होऊ शकली नाही. परवा म्हणजे मंगळवारी रात्री मी पुण्याला गेलो, त्यानंतर बुधवारी सकाळी मी ओमराजे निंबाळकर यांना भेटणार होतो. मात्र, त्यांची आणि माझी अद्याप भेट होऊ शकली नाही”, असा खुलासा आमदार कैलास पाटील यांनी केला.

दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेतून ओमराजे निंबाळकर यांनी पुन्हा माघारी यावं असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न विचारला असता, कैलास पाटील म्हणाले की, “माझी इच्छा देखील हीच आहे. या सर्व अफवा ठराव्यात आणि पुन्हा सर्वांनी उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करावेत. माझी अशी भावना आहे की उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सर्वांनी प्रामाणिक राहिलं पाहिजे.”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा