*संपादक -*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
२८ जानेवारीला सकाळी अतिशय वेदनादायी आणि सर्वांनाच दुःखात लोटणारी घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. संपूर्ण राज्यभरात,लोकांच्या मनामनात दुःख दाटले, कितीतरी मोठी असणारी माणसांचे हुंदके, आणि अश्रू, महाराष्ट्राने पाहिले. कितीतरी लोकांच्या मनात त्या क्षणापासून पोरके आणि असहाय असल्याची भावना निर्माण झाली. विविध पक्षात काम करणारे नेते आणि कार्यकर्त्यांना गहिवरून आले.सामान्य माणसं, महिला, विद्यार्थी, शेतकरी, मजुर, कामगार हुमसून हमसून रडले. याच कारण होतं अजितदादा यांची आणि त्यांच्या विकासकामांची राज्यावर उमटलेली छाप. त्यांचं रोखठोक बोलणं. आणि तेही साध्या ग्रामीण बोलीभाषेत.
अजितदादांची भाषणं ऐकायला यामुळेच मोठी गर्दी असायची. राजकारणी नेता असुनही त्यांची एखादया दाक्षिणात्य सुपरस्टार सारखी विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये क्रेझ होती.त्यांची रोखठोक,रांगडी भाषा आणि देहबोली सर्वांनाच सभेमध्ये खिळवून ठेवायची. अजितदादा लेखक, साहित्यीक नव्हते पण त्यांची भाषणातली विनोदी कोट्या करण्याची शैली, मोठमोठ्या लेखक साहित्यिकांना ही विचार करायला लावणारी होती. त्यांचे भाषण शहरात असो अगर खेड्यात त्यांनी त्यांची ग्रामीण बोली भाषा सोडली नाही. सुशिक्षित आणि प्रमाणभाषा वापरणारा वर्ग काय म्हणेल पत्रकार काय अर्थ घेतील याची त्यांनी कधी तमा ही बाळगली नाही. त्यांच्या भाषणात खेड्यातले वाक्प्रचार कित्येकदा यायचे. खरे तर या आणि अशा बाबींमुळेच ते सभा जिंकून घ्यायचे. कधीकधी पत्रकार उलटसुलट प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणूही पहायचे. तशा काही घटनाही घडल्या. ते कितीतरी पत्रकार बांधव अजितदादाच्या निधनाने गहिवरून गेले. कारण त्यांना माहित आहे. असा नेता पुन्हा होणार नाही.
अजितदादांनी आपली सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून किंवा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीपासून केली असल्याने त्यांना ग्रामीण भागातल्या लोकांचे, तसेच शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न माहित होते. अजितदादा हे राजकीय घराण्यात जन्मले वाढले असले तरी त्यांनी सुरुवातही कार्यकर्ता म्हणून केलेली होती. त्यामुळे खूप सारा अनुभव, आणि माहिती त्यांना होती.
त्यांचे तरुणपणाचे फोटो बघितले तरी आपल्याला समजून येते. खेड्यापाड्यातून राज्याच्या नेतृत्वा पर्यंत गेलेले दादा आपल्यातलेच आहेत. या मातीतलेच एक आहेत. त्यांना साध्यासाध्या कुटुंबात, घरात राहणारे लोकांच्या प्रश्नांची जाण आहे.
म्हणूनच सूरज चव्हाणसारख्या एका अतिशय गरीब घरातल्या रिलस्टारला ही त्यांनी मदतीचा आणि मायेचा प्रेमाचा हात दिला. त्यांच्या घराच्या बांधनीसाठी स्वतः लक्ष घातले. अशी कितीतरी ज्ञात अज्ञात उदारणं असतील जी आपल्याला माहित ही नसतील.
आ.अमोल मिटकरी हे प्रारंभी मराठा सेवा संघ या संघटनेच्या कार्यात होते. ते एक चांगले तरुण अभ्यासू व्याख्याते होते. महापुरुषांच्या जयंती आणि स्मृतिदिनाच्या निमित्ताने असणारी त्यांची व्याख्याने त्यावेळी तरुण वर्गात गाजत होती. अजितदादांनी त्यांचे व्याख्यान ऐकले आणि त्यांनी मिटकरी यांना आमदार केले. सामान्य घरातील युवकाला राजकारणात आणले. राजकारणात सदस्थितीत पदाधिकारी होणे किती कठीण आहे. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. साधा ग्रामपंचायत सदस्य व्हायचं असेल तरी किती पैसा, खर्च, माणसं सारी गणितं जुळवावी लागतात हे आपल्या सर्वांना माहित आहे. या ठिकाणी अमोल मिटकरी यांना कसलीही राजकीय आणि सांपत्तीक पार्श्वभूमी नसताना अजितदादांनी आमदार केले. ही गोष्ट सोपी नाही. नाहीतर आजही अमोल मिटकरी हे फक्त एक व्याख्याते म्हणूनच राहिले असते. राजकारणात स्थान मिळणे इतके सहज सोपे राहिले नाही. त्यासाठी अजितदादासारखे मोठे मन ही असायला हवे.
अशाअजितदादानी विकासाचे मुद्यावर आपले राजकारण केले. त्यांनी जात, धर्म, अशा बाबींचा राजकारणात आधार घेतला नाही.असे खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा म्हटले आहे.
त्यांच्या हिंदुत्ववादी पक्षांसोबत युती करून झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला अनेक पुरोगामी कार्यकर्ते, विचारवंत, पत्रकार आदिंनी टिका केली. पण अजितदादा सत्तेच्या प्रवाहात राहून काम करणारे नेतृत्व होते. हे त्यांनाही समजले. ती कितीतरी मंडळी पश्चाताप आणि दुःख व्यक्त करत आहेत.
पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या टिका -टिप्पणी आणि अजितदादावर केलेल्या भाषणामुळे आमदार महेश लांडगे हे पश्चाताप व्यक्त करत आहेत. शोकसभेत त्यांना गहिवरून आले. अजितदादांच्या फोटोसमोर उभे राहून त्यांनी "दादा मला माफ करा! " अशी आर्त हाक दिली.
कारण पुणे - पिंपरी चिंचवड महानगरांच्या विकासात अजितदादांचे खूप मोठे योगदान आहे. म्हणूनच आमदार लांडगे यांनी अजित सृष्टी उभारण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
अजितदादा हे संपूर्ण राज्याचे नेते असूनही वेगवेगळ्या तालुक्यातील, गावातील कार्यकर्त्यांशी लोकांशी त्यांचा थेट संपर्क असायचा. अशाच प्रकारचे संपर्क त्यांचा करमाळा तालुक्यातील लोकांशी कार्यकर्त्यांशी होता. करमाळा तालुक्यातील कोर्टी आणि सावडी भागात ते कडबा भरण्यासाठी तरुणपणी यायचे या त्यांच्या भाषणातील आठवणींच्या व्हिडीओची क्लिप सद्ध्या करमाळा तालुक्यात खूप वायरल झाली आहे. खूप तरुणांनी ती क्लिप मोबाईल स्टेट्सला ठेवली होती. सीनानदीला महापूर आला तेव्हा प्रशासनाला योग्य त्या सूचना आणि जनतेला योग्य ती काळजी घ्यायला लावणारे अजितदादा लोकांचा आधार होते. उजनी धरणात उभारला जात असलेला करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर मधील शिरसोडी या गावांशी जोडणारे खूप मोठ्या पूलाचे काम सद्ध्या खूप युद्धपातळीवर सुरु आहे. यासाठी ३९५ कोटी एवढी मोठी रक्कम खर्च करावी लागत असतानाही अजित दादांनी या पुलाचे कामास मंजुरी देऊन कामही कामही सद्ध्या सुरु आहे. अशीच कितीतरी उदाहरणे राज्यभरात आहेत.
आदरणीय शरद पवार साहेबांच्या छत्रछायेत जरी दादांनी राजकारणाचे धडे गिरवले असले तरी त्यांचा स्वतंत्र असा एक वेगळा विचारही त्यांनी निवडला. त्यात ते यशस्वी ही झाले. आदरणीय शरद पवार साहेबांच्या छत्रछायेतून बाहेर निघुनही त्यांनी आपले राजकारण सिद्ध करून दाखवले. सद्यस्थितीत साहेब आणि अजितदादा यांचे दोन्ही राष्ट्रवादींचा एकत्रीकरण होणार होते. त्या आधीच क्रूर नियतीने खेळ खेळला. अजितदादा आपल्या सर्वांतून निघून गेले. आपल्या कार्यकर्तृत्वाची फार मोठी छाप ठेवून........अशा या विकासाचं राजकारण करणार्या लोकनेत्यास विनम्र अभिवादन.....
संकलन,,,,,,,
हरिभाऊ हिरडे
पत्रकार
पोथरे, तालुका करमाळा जिल्हा सोलापूर
.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा