*पुणे, डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक *मो. 9922419159*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने ‘विशाखा काव्य पुरस्कार – २०२५’ घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार बुलढाणा येथील प्रेषित सिद्धभट्टी यांच्या ‘ विस्मरणाच्या अरण्यात ’ या काव्यसंग्रहाची प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. द्वितीय व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार अनुक्रमे श्रीमती महानंदा मोहिते ( पनवेल ) यांच्या ‘ घुंगुरमाळा ’ व बाळासाहेब नागरगोजे ( बीड ) यांच्या ‘ युद्ध पेटले आहे ’ या काव्यसंग्रहाला घोषित करण्यात आला.
‘विशाखा काव्य पुरस्कार – २०२५’ तसेच प्रसिद्ध ओडिया कवी हरप्रसाद दास यांना जाहीर झालेला ‘ कविवर्य कुसुमाग्रज राष्ट्रीय जीवनगौरव साहित्य पुरस्कार - २०२५ ’ या दोन्ही पुरस्कारांचा एकत्रित पुरस्कार वितरण समारंभ विद्यापीठ मुख्यालयात शनिवार दिनांक २८ मार्च २०२६ रोजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे. त्यात विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार व १० हजार रुपयांसह सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सन २०२५ च्या विशाखा काव्य पुरस्कारासाठी विद्यापीठास एकूण २८ काव्यसंग्रह प्राप्त झाले होते. प्राथमिक छाननी समितीने ११ संग्रह निवडून दिले. अंतिम निवड समितीने या संग्रहांमधून वरीलप्रमाणे काव्य संग्रहांची पुरस्कारांसाठी निवड केली आहे. कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने संघटित समित्यांनी ही द्विस्तरीय निवडप्रक्रिया पार पाडली. या निवड प्रक्रियेचे समन्वयक म्हणून कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे यांनी काम पहिले. अंतिम निवड समिती सदस्य म्हणून रणधीर शिंदे ( कोल्हापूर ), रावसाहेब कुवर ( साक्री ), तन्वी अमित ( नाशिक) यांनी काम पाहिले.
विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने दरवर्षी नवोदित कवींच्या प्रथमतःच प्रकाशित काव्यसंग्रहाला ‘ विशाखा काव्य पुरस्कार ’ दिला जातो. या पुरस्कारार्थींचे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे, प्र कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रा. संजीवनी महाले व कुलसचिव (प्र.) तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे यांनी अभिनंदन केले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा