*तुळजापूर -प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
तुळजापूर:तुळजापूर शहरातील गट नं. 138/1 मधील कथित बेकायदेशीर विकासकाम, अनधिकृत बांधकामे आणि संशयास्पद खरेदी-विक्री व्यवहार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणी माजी उपनगराध्यक्ष यांच्यासह 26 जणांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नगरसेविका सौ.प्रगती गोपाळ लोंढे यांच्यावतिने नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
तक्रारदारांनी दिलेल्या निवेदनानुसार, तुळजापूर येथील गट नं. 138/1 मधील सुमारे 2 हेक्टर 63 आर जमिनीमध्ये बेकायदेशीर विकास आराखडा तयार करून त्याआधारे खरेदी-विक्री व्यवहार करण्यात आले. तसेच या ठिकाणी अनधिकृत बांधकामे, पत्र्याचे गाळे व इतर बांधकामे उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी यापूर्वीही जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठीत केली होती. तसेच उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार तुळजापूर यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. या दोन्ही समित्यांनी केलेल्या चौकशी अहवालात गंभीर अनियमितता समोर आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
समितीच्या अहवालानुसार, नगर रचनाकार कार्यालयाने मंजूर केलेल्या मूळ भू-अभिन्यासात आणि खरेदीखतासोबत जोडलेल्या आराखड्यात तफावत आढळून आली. खरेदीखतासोबत सादर करण्यात आलेली भू-अभिन्यास प्रत अधिकृत मंजुरीपेक्षा वेगळी असल्याचे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. तसेच मानीव भू-अभिन्यास मंजुरी व त्याआधारे करण्यात आलेले व्यवहार बेकायदेशीर असल्याचेही समितीने स्पष्ट केले आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, चुकीच्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेले खरेदी व्यवहार रद्द करण्यात यावेत, तसेच नगरपालिकेकडून देण्यात आलेल्या बांधकाम परवानग्याही रद्द करण्यात याव्यात. याशिवाय महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 च्या कलम 52 व 53 तसेच भारतीय नोंदणी अधिनियम 1908 मधील नियम 82 व 83 अंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच गट नं. 138/1 मधील सर्व अनधिकृत बांधकामे तातडीने हटवून संबंधितांवर जास्तीत जास्त शिक्षा व दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच सर्व महिलांच्या वतीने दिलेल्या निवेदनाची दखल 24 जून 2026 पर्यंत नाही घेतल्यास नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्या दालनात 25 जून 2026 रोजी असंख्य महिलांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे तुळजापूर शहरात पुन्हा एकदा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून नगरपरिषद प्रशासन पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवेदनावर सुकन्या कदम,ज्योती कदम,अविदा जगताप,कविता लोंढे,वैशाली लोंढे,दिपाली बर्वे,वनिता कदम,वंदना कदम,रेश्मा कदम,संगीता परदेशी,रेखा भिसे,जयश्री लोंढे,सुवर्णा पेंदे तसेच नगरसेवक अमोल कुतवळ,आनंद जगताप,रणजीत इंगळे,अक्षय परमेश्वर,अमोल जाधव,रमेश चिवचिवे,संजय लोंढे,संभाजी नेपते,किरण कदम,विक्रम कदम,मल्हार बर्वे,दयानंद लोंढे,मयूर कदम,किरण लोंढे,पृथ्वीराज कदम,बाळासाहेब कदम,विलास कदम तसेच जय अंबिका तरुण मंडळाचे संपूर्ण सदस्य व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनाची माहितीस्तव प्रत धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,जिल्हाधिकारी धाराशिव तसेच पोलीस निरीक्षक तुळजापूर यांना देण्यात आली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा