पुणे, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
इंदापुरातील शेतकऱ्यांचे पुणे सिंचन भवन येथे हक्काच्या पाण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन, संपूर्ण झाले मात्र आंदोलन नेत्यांनी हायजॅक केल्याची शेतकऱ्यांची भावना, नेत्यांच्या समोर तीन जून रोजी पाणी सोडण्याचे दिले गेले गुळगुळीत आश्वासन, परंतु जो नियमित पाणी देणार, तोच इंदापूरचा भावी आमदार होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
इंदापूर तालुका हा नीरा भीमा नद्यांच्या खोऱ्यात वसलेला असताना देखील तालुक्यात पाणी समस्याने गंभीर रूप धारण केले आहे. उजनी धरण उशाशी, नेते तुपाशी तर अन्नदाता शेतकरी मात्र उपाशी अशी परिस्थिती केवळ व्यवस्थित पाणी नियोजन न झाल्याने निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी इंदापूर तालुक्यात आंदोलन करून देखील प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने प्रखर उन्हात पुणे सिंचन भवन गाठून बोंबाबोंब आंदोलन करून आपला असंतोष व्यक्त केला. यावेळी अधिकारी पाणी विकतात असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केल
खडकवासला धरण साखळीतून इंदापूर तालुक्यास मिळणारे हक्काचे आवर्तन न मिळाल्याने खडकवासला लाभक्षेत्रातील तालुक्यातील ३६ गावातील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन केले. त्याची प्रशासनाने योग्य दखल न घेतल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी थेट पुणे सिंचन भवन गाठून बोंबाबोंब आंदोलन सुरू केले. जोपर्यंत पाणी आवर्तन सोडणार नाही, तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन तसेच पेटलेले पाणी लक्षात घेऊन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे, पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे यांनी आंदोलनस्थळी खडकवासला धरण अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून पाणी सोडावे असे आवाहन केले. त्यानंतर अधिकारी श्री. देशमुख तसेच श्री. फाळके यांनी दिनांक ३ जून रोजी आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिले मात्र या उत्तराने शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांना दिनांक १२ मे रोजी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते मात्र अखेर ते दिवास्वप्न ठरले ! त्यामुळे तीन जून ला पाणी सुटेल याची खात्री शेतकऱ्यांना वाटत नाही.
दरम्यान यासंदर्भात मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत समांतर पाणी देण्याचे ठरले होते मात्र इंदापूर व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची तक्रार करणार आहे, दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रचंड ऊन असताना पुण्यात सिंचन भवन येथे येऊन हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन करावे लागते ही लाजिरवाणी बाब आहे. खरेतर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ७ टीएमसी पाणी सिंचनासाठी आरक्षित आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात तातडीने हे पाणी न सोडल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन तीव्र करण्यात येईल. त्यास प्रशासन जबाबदार राहील.
पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे म्हणाले, अन्नदाता शेतकरी हा बळीराजा आहे मात्र शेतकऱ्यांना हक्काचे पाणी न मिळाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्का साठी आपण या आंदोलनात सहभागी झालो आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले, कळस परिसरात विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतातील उभी पिके पाण्या अभावी जळत आहे. पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या नुकसानीस कोण जबाबदार आहे असा संतप्त सवाल त्यांनी केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. शशिकांत तरंगे म्हणाले, खडकवासला धरणात पुरेसे पाणी असताना देखील हक्काचे उन्हाळी आवर्तन देण्यात अधिकाऱ्यांनी कुचराई केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. पाण्याच्या आंदोलनामुळे आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी दक्ष राहणे गरजेचे आहे.
यावेळी बाबामहाराज खारतोडे, सागर मिसाळ, भाजपा महामंत्री तानाजी मारकड, प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, रमेश खारतोडे, आबासाहेब थोरात, अविनाश मोहिते, विजय गावडे उपस्थित होते.
पुण्यातील आंदोलना वर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे श्रीनिवास शेळके म्हणाले, राज्यात महायुतीची सत्ता असून सत्तेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट सहभागी आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपा नेते प्रदीप गारटकर व प्रवीण माने हे सर्व सत्तेत असताना तालुक्यातील शेतकऱ्यांना पदरमोड करून जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन पाण्यासाठी आंदोलन करावे लागले हे दुर्दैव आहे. हे सर्व नेते सत्ते साठी एकत्र आले असून शेतकऱ्यांना मात्र कोणीही वाली नाही. खरे तर उजनी धरणाचे पावसाळ्यात खाली वाहून जाणारे पाणी चांडगाव, व्याहळी, निमगाव केतकी, वरकुटे खुर्द, निरवांगी येथून नीरा नदीत सोडल्यास तालुका २२ गावासह बारमाही होईल मात्र तालुक्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये ही राजकीय इच्छाशक्ती तसेच दूरदृष्टी नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा