*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
नीरा नदीवरील सराटीसह सहा बंधाऱ्यातील पाणी आटल्याने नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांच्या पिण्याच्या पाणी योजना बंद पडल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तर जनावरांच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरेत पाणी सोडून बंधारे भरण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
नीरा नदीतील पाणी आटल्याने जवळपास सहा बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील गिरवी, ओझरे, लुमेवाडी, अकलाई, सराटी, निरनिमगाव तर माळशिरस तालुक्यातील संगम, गणेशगाव, तांबवे, माळीनगर, अकलूज, आनंदनगर, चाकोरे गावांच्या पिण्याच्या पाणी योजना बंद पडल्याने पाणीटंचाई तीव्र झाली आहे. यामुळे पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
नीरा नदीच्या पाण्यावर इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेकडो एकर शेतीवरील पिके जोपासली जातात. परंतु नदीतील वाळूच्या बेसुमार उपशामुळे नदी पात्राचे खडकाळ माळरानात रूपांतर झाले आहे. त्यामुळे नदीत साठलेले पाणी वाळूअभावी लगेच आटून जात आहे. त्याचा परिणाम शेतीवरील पिकांवर झाला असून अनेक ठिकाणी पिके जळून चालली आहेत. तर अनेक ठिकाणी शेती ओसाड ठेवण्याची वेळ शेतकरी राजावर आली आहे. वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडून बंधारे भरून घेण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
बंधाऱ्यात अडवलेले पाणी टिकून राहण्यासाठी बंधाऱ्याची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. पावसाळ्यात पुरपरस्थितीने बंधारेचे झालेले नुकसान भरून घ्यावे. नादुरुस्त बंधारे पावसाळ्यापुर्वी दुरूस्ती करून पाणी अडवणे लायक करावेत अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे. पाण्याअभावी जळून चाललेल्या पिकांना पाण्याची सोय करण्यात यावी अशीही मागणी होत आहे.
फोटो - सराटी ( ता. इंदापूर ) येथील पाण्याअभावी कोरडा पडलेला बंधारा दिसत आहे.
.....................................................................




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा