*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
नांदेड :- Insurance coverage exceeding ₹33 crore : आजकालची लग्नं म्हटली की डोळे दिपवणारी रोषणाई, महागडे कपडे आणि पैशांचे अवाढव्य प्रदर्शन हे समीकरणच बनले आहे. पण याच झगमगाटाच्या जगात नांदेडमधील एका कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नात असा काही आदर्श घालून दिला आहे, ज्याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. लग्नकार्यातील अवाजवी खर्चाला फाटा देत या कुटुंबाने संपूर्ण गावालाच सुरक्षेचे एक अनोखे ‘रिटर्न गिफ्ट’ दिले आहे.
कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील सिद्धेश्वर पेठकर यांचा विवाह २० मे रोजी संपन्न झाला. या लग्नाचे औचित्य साधत पेठकर कुटुंबाने सामाजिक भान जपले. लग्नाला आलेल्या पाहुण्यांना नेहमीचे पारंपरिक आहेर किंवा भेटवस्तू देण्याऐवजी, त्यांनी आपल्या बहादरपुरा गावातील प्रत्येक नागरिकाचा अपघात विमा उतरवला आह
३३ कोटींहून अधिक रकमेचे विमा कवच
या अनोख्या उपक्रमांतर्गत गावातील तब्बल ३ हजार ४६५ नागरिकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे अपघात विमा कवच देण्यात आले आहे. म्हणजेच पेठकर कुटुंबाने संपूर्ण गावाची मिळून एकूण ३३.६ कोटी रुपयांची विमा पॉलिसी काढली आहे. सिद्धेश्वर आणि त्यांचे मोठे भाऊ अनूप पेठकर यांच्या संकल्पनेतून हा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला.
ग्रामीण भागातील वास्तव ओळखून घेतला निर्णय
“लग्नाचा आनंद केवळ आमच्यापुरता मर्यादित न राहता तो गावकऱ्यांच्या आयुष्यात सुरक्षितता आणणारा ठरावा,” अशी भावना अनुप पेठकर यांनी व्यक्त केली. या कल्पनेविषयी बोलताना ते म्हणाले, “ग्रामीण भागात साप चावणे, अंगावर वीज पडणे किंवा इतर अनपेक्षित अपघातांमुळे मृत्यू होण्याच्या घटना अनेकदा घडतात. अशा वेळी गरीब कुटुंबांवर आभाळ कोसळते. माझ्या लहान भावाचे लग्न हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण होता. हाच आनंद द्विगुणित करताना गावकऱ्यांसाठी काहीतरी ठोस आणि उपयुक्त करावे, या विचारातून आम्ही हा निर्णय घेतला.”
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पारदर्शक नियोजन
गावातील एकही पात्र नागरिक या सुविधेपासून वंचित राहू नये, यासाठी पेठकर कुटुंबाने अत्यंत पद्धतशीर नियोजन केले होते. त्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीच्या नावाने ‘ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी’ (सामूहिक विमा) खरेदी केली. यासाठी गावातील मतदार यादीचा आधार घेण्यात आला, जेणेकरून विमा कंपनीकडे प्रत्येक गावकऱ्याची अचूक नोंद होईल.
“दान गुप्त असावे…”; प्रसिद्धीपासून कुटुंब दूर
एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांचा विमा उतरवण्यासाठी नेमका किती खर्च आला, हे सांगण्यास मात्र या कुटुंबाने नम्रपणे नकार दिला. नवरदेव सिद्धेश्वर पेठकर म्हणाले, “आमच्या संस्कृतीत दानाचा गाजावाजा केला जात नाही. आम्हाला कोणत्याही प्रसिद्धीची किंवा कौतुकाची हाव नाही. आमच्या या छोट्याशा प्रयत्नामुळे गावकऱ्यांचे भले व्हावे आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत, हीच आमची इच्छा आहे.”
*👇----++; जाहिरात:-------*👇
संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव
या विवाह सोहळ्याला ४,५०० हून अधिक वऱ्हाडी आणि पाहुणे उपस्थित होते. मात्र, लग्नातील इतर थाटामाटापेक्षा पेठकर कुटुंबाने दिलेल्या या ‘सुरक्षा कवचा’चीच चर्चा अधिक रंगली. गावातील नागरिक मोहन शेकापुरे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “लग्न तर खूप थाटात झाले, पण पेठकर कुटुंबाच्या या निर्णयाने हे लग्न आमच्यासाठी अविस्मरणीय ठरले आहे. आजपर्यंत आम्ही असे रिटर्न गिफ्ट कधीच पाहिले नव्हते.”
बहादरपुरा गावचे सरपंच बळीराम पेठकर यांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. “संपूर्ण गावाला लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून अपघात विमा मिळण्याची ही कदाचित पहिलीच ऐतिहासिक घटना असावी,” असे ते अभिमानाने म्हणाले. हे अपघात विमा कवच आगामी एका वर्षासाठी वैध असणार असून, पुढील काळात या पॉलिसीचे नूतनीकरण (रिन्यू) करण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे कुटुंबाकडून सांगण्यात आले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा