*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
मुंबई : मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी करणारा मिसिंग लिंक प्रकल्प नुकताच सेवेत दाखल झाला आहे. या मिसिंग लिंकला वाहनचालक-प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
जागतिक स्तरावर नाव मिळवलेल्या या प्रकल्पास आता वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) होत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करून महामार्गाची क्षमता वाढविण्यासाठी एमएसआरडीसीने १३.३ किमीचा मिसिंग लिंक अर्थात खोपोली ते कुसगाव अशी नवीन मार्गिका बांधली आहे. १ मेपासून ही मार्गिका सेवेत दाखल झाली असून या मार्गिकेमुळे प्रवास सुसाट झाला आहे.
या मार्गिकेच्या लोकार्पणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पास मिसिंग लिंक न म्हणता कनेक्टिंग लिंक असे संबोधावे, अशी सूचना एमएसआरडीसीला केली होती. तसेच लवकरच या प्रकल्पाचे नामांतर करू, असेही जाहीर केले होते. दरम्यान, या प्रकल्पास अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. दुसरीकडे वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांच्या नावासाठी धनगर समाज आग्रही आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गास शिंग्रोबांचे नाव देण्याची मागणी धनगर समाजाची होती.
मात्र त्यांची मागणी मान्य झाली नाही आणि महामार्गास यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले. पण आता तरी मिसिंग लिंकला शिंग्रोबांचेच नाव द्यावे, अशी जोरदार मागणी धनगर समाजाकडून केली जात आहे. यावर आता राज्य सरकारची काय भूमिका असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोण होते शिंग्रोबा धनगर शिंग्रोबा धनगर हे बोरघाटात राहत होते. मेंढपाळ असलेल्या शिंग्रोबांना सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांची आणि आडवाटांची खडानखडा माहिती होती. १८५० मध्ये इंग्रजांनी मुंबई-पुणे प्रवास कसा कमी करता येईल याचा विचार सुरू केला. त्यासाठी अनेक समित्या नेमल्या, या क्षेत्रातील तज्ज्ञ इंग्रज अधिकाऱ्यांची फौज कामाला लावली.
मात्र या समित्यांना, अधिकाऱ्यांना सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून कसा मार्ग काढावा याचे उत्तर काही केल्या मिळेना. इंग्रज अधिकारी रोज यायचे, तपासणी करायचे. अशावेळी तिथे असलेल्या शिंग्रोबांना हे काय चालले आहे, हे रोज येऊन काय शोधतात, असा प्रश्न पडला. त्यांनी तशी विचारणा इंग्रज अधिकाऱ्यांकडे केली. तेव्हा मुंबई-पुणे रेल्वे मार्गाचा ते शोध घेत असल्याचे समोर आले. शिंग्रोबांनी यावर त्यांना, चला मी दाखवतो तुम्हाला मार्ग, असे म्हणत मुंबई-पुणे मार्ग इंग्रजांना दाखवला आणि एक अभियांत्रिकी चमत्कार घडला. मुंबई-पुणे प्रवास सुरू झाला.
दरम्यान, शिंग्रोबांवर खुश झालेल्या इंग्रजांनी त्यांना काय बक्षीस हवे असे विचारले असता, शिंग्रोबांनी 'साहेब, मला काय द्यायचे असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या,' अशी मागणी केली. यावर चिडलेल्या कृतघ्न इंग्रजांनी शिंग्रोबांना गोळ्या घातल्या आणि सह्याद्रीच्या कुशीत शिंग्रोबांचे रक्त सांडले. शिंग्रोबांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. खंडाळ्याच्या घाटात मंदिर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून जाताना खंडाळा घाटाच्या माथ्यावर शिंग्रोबांचे मंदिर आहे.
मुंबई-पुणे मार्ग शोधणाऱ्या आणि देशासाठी बलिदान पत्करणाऱ्या शिंग्रोबांचे नाव आता मिसिंग लिंकला देण्याची मागणी होत आहे. याविषयी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता हा धोरणात्मक निर्णय असून त्याबाबत राज्य सरकारच निर्णय घेईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र धनगर समाज या नावासाठी आग्रही आहे. शिंग्रोबाचे नाव मिसिंग लिंकला न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा