इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
कर्मयोगी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय कै. शंकरराव पाटील उर्फ भाऊ, संस्थापक उपाध्यक्ष वै. गोकुळदास शहा उर्फ भाई व तत्कालीन संचालक मंडळाने वालचंदनगर येथील खाजगी कारखाना बिजवडी येथे सहकारी तत्वावर शेतकऱ्यांच्या मालकीचा बनविला. त्यानंतर कारखान्याने प्रगती करत राष्ट्रीय स्तरावरील कुशल अर्थ व्यवस्थापनाची तीन पारितोषिके पटकावली. देशाचे कृषी मंत्री झालेले राष्ट्रीय नेते शरद पवार हे देखील कारखाना तसेच कामगारांच्या प्रश्नावर भाऊ व भाईंचा सल्ला घेत असत. मात्र आता कारखान्याचे अर्थ व्यवस्थापन संपूर्ण बिघडले असून शेतकऱ्यांच्या गाळप ऊसाची बिले अद्याप मिळाली नाहीत. त्यामुळे नेते तुपाशी तर शेतकरी मात्र उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीत गळ्यात गळे घालणारे तसेच
आमच्यात भांडणे लावणारे कार्यकर्ते असे म्हणत एकमेकांना ऊसापासून बनलेल्या साखरेची मिठाई भरविणारे नेते मात्र शेतकऱ्यांच्या बिलाबद्दल सूचक मौन बाळगत आहेत. आपला व आपल्या पुढील पिढीचे राजकीय भवितव्य उज्वल व्हावे म्हणून पळणारे नेते मात्र शेतकऱ्यांच्या प्रपंचात मिठाचा खडा टाकत आहेत. शेतकऱ्यांनी कारखान्यावर अर्धनग्न आंदोलन केल्यानंतर सुद्धा तालुक्यातील नेत्यांना जाग येत नाही यापेक्षा मोठे दुर्दैव नाही !
कर्मयोगी कारखान्याचे कार्यक्षेत्र ५७ गावात असून उजनी धरणाचे अथांग पाणलोट क्षेत्र कारखान्याच्या उशाशी आहे. कमी वाहतूक व चांगल्या पद्धतीचा ऊस असल्यामुळे आदरणीय भाऊ, त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती लीलावती पाटील यांच्याकडे कारखान्याची सूत्रे आली तोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रपंच व्यवस्थित सुरू होता. मात्र आदरणीय वहिनींच्या निधनानंतर कारखान्याची सूत्रे राज्याचे मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आली. या कालावधीत कारखान्यात विविध प्रकल्प कार्यान्वित झाले. साखर उत्पादन व विक्री खर्च यामध्ये तफावत निर्माण झाली. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी कारखान्यावर चक्का जाम आंदोलन केले, त्यानंतर कारखान्याचे अर्थकारण ठप्प होत गेले. कारखाना देशात व राज्यात टॉप टेन मध्ये आणू असे सातत्याने जाहीर आश्वासन देणारे राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना कारखान्याचे अर्थकारण सक्षमीकरण करता आले नाही. एकीकडे संपूर्ण साखर उद्योगात शाश्वत ऊस विकास धोरण आखणारे हर्षवर्धन पाटील यांच्या हातून कारखान्याचे अर्थकारण निसटले. त्याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली. सुमारे २० वर्ष राज्य मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रिपद भोगलेल्या हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत नवख्या दत्तात्रय भरणे यांनी धूळ चारली. प्रत्येक निवडणुकीत राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे हर्षवर्धन पाटील यांच्या आत्मकेंद्रित विकासावर प्रचंड टीका करायचे मात्र त्यातून हर्षवर्धन पाटील यांनी कुठलाच बोध घेतला नाही! विधानसभेस सलग तीन वेळा पराभव पत्करावा लागल्यानंतर सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी आत्मपरीक्षण केले नाही, त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द डळमळीत झाली असताना भाजपच्या जवळकीमुळे त्यांच्या कडे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्षपद चालून आले. त्यामुळे कर्मयोगी कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. या काळात हर्षवर्धन पाटील यांनी ओंकार शुगरचे बाबुराव बोत्रे यांच्याशी संपर्क साधून कारखाना चालविण्या साठी त्यांचे सहकार्य घेतले. त्याला सहकारातील पथदर्शी प्रयोग असे गोंडस नाव दिले मात्र पहिले पाढे पंचावन्न झाले !
सध्या केंद्र व राज्याच्या सत्तेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना आहे. तालुक्यात भाजपाचे नेते प्रदीप गारटकर, प्रवीण माने आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे हे राज्याचे कृषी मंत्री, आप्पासाहेब जगदाळे हे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आहेत तर माजी सहकार मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष आहेत. उपरोक्त सर्व वजनदार नेते असताना कर्मयोगी कारखान्यास गाळप केलेल्या ऊसाचे शेतकऱ्यांचे पैसे देण्यास विलंब होत आहे, पैश्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे हे दुर्दैव आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवास विविध कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणून कर्मयोगी कारखान्याच्या सभासदांना जबाबदार धरून हा कारखाना बंद पाडून सर्व ऊस नीरा भीमा कारखान्याकडे वळविण्याचे धोरण असल्याचे उघड गुपीत सध्या शेतकऱ्यांमध्ये चर्चिले जात आहे. त्यातच कारखाना संचालक मंडळाची बँक खाती सील करण्यात आल्याची चर्चा आहे. सध्या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसावर परिसरातील चार ते पाच कारखाने ऊस नेवून गाळप करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न होणे ही काळाची गरज आहे.
एकेकाळी इंदापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र आता तो अस्तित्वासाठी झटत आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानावर आंदोलन करून त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये कर्मयोगी कारखान्याचा गोडवा नव्हता. त्यातच सध्या सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे देखील शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच मान्सूनपुर्व पावसामुळे अनेकांच्या केळी, जांभूळ, डाळिंबाच्या बागा याचे तालुक्यात ३३ गावात नुकसान झाले आहे. त्यामुळे आस्मानी तसेच सुलतानी संकटाने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याची आर्थिक सालचंदी धोक्यात आली असून मुलांची लग्ने, शिक्षण, कर्जे व इतर प्रश्न कसे सोडवायचे या विवंचनेत शेतकरी आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणीही वाली नसल्याचे स्पष्ट होते. त्यातच खडकवासल्याचे हक्काचे पाणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना तीव्र आंदोलन करावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. तालुक्यातील नेते सत्तेत एकत्र असल्याने त्यांचे बरे चालले आहे. नेते सत्तेत मश्गूल आहेत. राजकीय आशीर्वादाने प्रशासन मस्त तर शेतकरी मात्र त्रस्त आहेत.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा