*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बार्शीतील शिवशक्ती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट समर कॅम्पदरम्यान शनिवारी सकाळी एक अत्यंत भीषण घटना घडली. इथं क्रिकेट पिच तयार करण्यासाठी वापरला जाणारा जड रोलर अंगावरून गेल्याने १५ वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय १५ वर्षे) असं या मृत मुलाचं नाव असून तो नववीच्या वर्गात शिकत होता. या घटनेमुळे बार्शी शहरासह क्रीडा क्षेत्रात प्रचंड शोककळा पसरली आहे.
निष्काळजीपणामुळे निष्पाप मुलाचा बळी?
मृत आरवचे वडील योगीराज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी येथील प्रसिद्ध शिवशक्ती मैदानावर 'बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन'तर्फे मुलांसाठी क्रिकेट समर कॅम्पचे आयोजन करण्यात आलं होतं. योग्य ती फी भरून आरवला या कॅम्पमध्ये क्रिकेटचे रीतसर प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश देण्यात आला होता. या कॅम्पमध्ये मुख्य कोच म्हणून विवेक दुगम आणि अक्षय देबडवार हे मुलांना क्रिकेटचे धडे देत होते.
शनिवारी सकाळी आरव नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहाने सरावासाठी मैदानावर गेला होता. सकाळी ७ ते ७:३० च्या सुमारास मैदानावर सराव सुरू असताना, कोचच्या निर्देशानुसार १२ ते १५ वर्षे वयोगटातील लहान मुलांकडून क्रिकेट पिच सपाट करण्यासाठी वापरला जाणारा अत्यंत जड लोखंडी रोलर ओढण्याचं काम करून घेतलं जात होतं. यावेळी कोणताही मुख्य प्रशिक्षक किंवा कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित नव्हती. दोन्ही कोच मैदानावर मुलांपासून दूर उभे होते.
लहान मुलांसोबत जड रोलर ओढत असताना अचानक आरवचा पाय घसरला आणि त्याचा तोल जाऊन तो जमिनीवर कोसळला. मुले रोलर ओढत असल्याने तो जड रोलर आरवच्या पायापासून थेट छातीपर्यंत अंगावरून गेला. यात आरवला अंतर्गत गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
या घटनेनंतर आरवला तत्काळ उपचारासाठी बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी तपासणी अंती उपचारापूर्वीच आरवला मृत घोषित केलं. क्रिकेटर बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या मुलाचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी बार्शी पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा