*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
- इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार व दीर्घकाळाच्या भारनियमनामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी, इंदापूर तालुक्याच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली.
सध्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत शेतीसाठी आवश्यक असलेले सिंचन, विहिरी, बोअरवेल तसेच विविध विद्युत पंपांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र सततच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेत पाणी देणे अशक्य होत असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागातील लघु व मध्यम व्यावसायिकांनाही या भारनियमनाचा मोठा फटका बसत आहे. वीज नसल्यामुळे अनेक उद्योगधंदे व व्यावसायिक आस्थापना वेळेवर सुरू राहू शकत नाहीत. परिणामी आर्थिक नुकसान होत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.
विद्यार्थ्यांनाही या समस्येचा गंभीर फटका बसत आहे. परीक्षांचा कालावधी सुरू असताना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत आहेत. डिजिटल शिक्षण, ऑनलाइन अभ्यास व इतर शैक्षणिक उपक्रमांवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना, आरोग्य सेवा, लहान उद्योग तसेच घरगुती कामांवरही या भारनियमनाचा परिणाम होत आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांवर परिणाम होत असल्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरण प्रशासनाला इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी त्वरित उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. इंदापूर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने पाठपुरावा करीत राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी मारुती आण्णा वनवे, तेजस देवकाते, बाळासाहेब पानसरे, यशवंत कचरे, शुभम शिंगाडे, मिलिंद शिंदे, पोपट शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी ग्रामीण भागातील सुरू असलेल्या भारनियमनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
*चौकट*
वादळामुळे अनेक ठिकाणी विजवाहिण्या व विज खांब पडलेलं आहेत त्याची तात्काळ दुरुस्ती करून विज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
*प्रविण माने*
भाजपा नेते





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा