*पुणे, डॉ. संदेश शहा*.
*दिनांक १५ जून २६*
*टाइम्स 45 न्यूज मराठी* *सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*
जैन समाजातील युवक-युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा, समाजातील वैवाहिक संवादाला चालना मिळावी तसेच कुटुंबांमध्ये स्नेहबंध दृढ व्हावेत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला "सकल जैन परिचय ते परिणय" वधू-वर परिचय मेळावा पुणे आनंद दरबार दत्तनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यास वधू वर तसेच पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
मेळाव्यात राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने वधू-वर, पालक व समाजबांधव सहभागी झाले होते. उपस्थितांना प्रत्यक्ष संवाद साधण्याची, एकमेकांची ओळख करून घेण्याची आणि विवाहासाठी योग्य पर्यायांचा विचार करण्याची संधी देण्यात आली. या कार्यक्रमा मुळे अनेक कुटुंबांना परस्पर संपर्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक युवराजजी शहा यांनी सध्या वाढत चाललेल्या लग्नातील अवाजवी खर्च आणि लाइफस्टाईल, दिखाऊपणा आणि इव्हेंट मॅनेजमेंट संस्कृतीबाबत चिंता व्यक्त केली. विवाह सोहळा हा केवळ भपकेबाज कार्यक्रम नसून दोन कुटुंबांच्या मनोमिलनाचा आणि सामाजिक बंध दृढ करणारा संस्कार असल्याचे त्यांनी सांगितले. जोडीदार निवडताना केवळ कुंडली पाहण्यात वेळ न दवडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा व परस्पर समज, एकमेकांना योग्य सन्मान, विचारांची जुळवाजुळव आणि संस्कार यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रम आयोजना बद्दल बोलताना आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका म्हणाले, करिअर घडवण्यासाठी अथक परिश्रम, जिद्द आणि समर्पण आवश्यक असते; मात्र त्या यशाचा खरा आनंद अनुभवण्यासाठी जीवनसाथीची साथ देखील तितकीच महत्त्वाची असते. म्हणूनच जीवनसाथी विना करिअर अनेकदा अधुरे वाटते. योग्य वयात योग्य जोडीदाराची निवड करून प्रेम, विश्वास आणि समजुतीच्या आधारावर संसार उभारणे हाच यशस्वी, आनंदी आणि परिपूर्ण जीवनाचा राजमार्ग आहे.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे आधारस्तंभ रमणलालजी लुंकड, समारोह गौरव अचलजी जैन आणि विलासजी राठोड हे मान्यवर उपस्थित होते.
सुरेखा बेताळा, सौ. पूजा गुगळे जैन आणि सौ. कविता श्रीश्रीमाळ यांनी ‘परिचय ते परिणय : सहजीवनाचा मंगलमय प्रवास’ या विषयावर अनोख्या प्रश्नोत्तर उपक्रमाच्या माध्यमातून उपस्थित तरुण-तरुणींना वैवाहिक जीवनातील विविध पैलू उलगडून सांगितले. विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन कुटुंबांच्या मनोमिलनाचा प्रवास असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कार्यक्रमात सहभागी युवक-युवतींचे वीस जणांचे गट तयार करून त्यांना सहजीवनाशी संबंधित विविध प्रश्नावली देण्यात आली. या प्रश्नांवर गटचर्चा करून सहभागी तरुण तरुणींनी विचारपूर्वक उत्तरे शोधली. सुखी, समंजस आणि यशस्वी संसाराची मुहूर्तमेढ कशी रोवता येईल, याबाबत त्यांनी आपले विचार मांडले. या उपक्रमामुळे विवाहपूर्व समुपदेशनासह सहजीवनातील जबाबदाऱ्या, संवाद आणि परस्पर समज यांचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित झाले.
मेळावा यशस्वीतेसाठी पृथ्वीराज धोका, डॉ. अशोक पगारिया, अशोक कटारिया, सुनील देसर्डा, सुरेखा बेताळा, सौ. पूजा गुगळे जैन, सौ. कविता श्रीश्रीमाळ आणि दिलीप संचेती यांनी विशेष परिश्रम घेतले.
उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा समाजोपयोगी कार्यक्रमांमुळे विवाह जुळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होत असल्याचे मत व्यक्त केले. समाजातील एकोपा, संवाद आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्यासाठी हा मेळावा प्रेरणादायी ठरला. आयोजकांनी भविष्यातही अशाच स्वरूपाचे उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा