इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. 9922419159
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी 'यश कल्पतरू प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र’ या अत्यंत महत्त्वाकांक्षी, पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात केली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांचे मार्गदर्शन व निर्देशानुसार विद्यापीठ आवारातील तब्बल दोन हजार झाडांच्या नारळांपासून शंभर टक्के नैसर्गिक, शुद्ध व दर्जेदार नारळ तेलाचे उत्पादन सुरु करण्यात आले आहे. हे तेल केवळ केसांसाठीच नव्हे, तर खाण्यासाठी सुद्धा अत्यंत उत्तम आणि आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणित झाले आहे. येथे नारळ उत्पादक शेतकरी, ग्रामीण महिला तसेच बेरोजगार युवक व युवती यांना नारळ प्रक्रिया उद्योगाचे विशेष कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेवून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची देखील संधी निर्माण झाली आहे.
विद्यापीठ परिसरामध्ये सुमारे २००० बाणवली वाणाच्या नारळाच्या झाडांची पद्धतशीर लागवड करण्यात आली असून या झाडां पासून वर्षाला अंदाजे ४० ते ५० हजार नारळांचे विक्रमी उत्पादन मिळते. पूर्वी या नारळांची केवळ साल काढून ताज्या खोबऱ्यासाठी विक्री केली जात असे. मात्र, दिवसेंदिवस नारळाचे उत्पादन वाढत असल्याने आणि वेळेवर विक्री न झाल्यास फळे अति कोरडे होणे किंवा बुरशी लागून ती खराब होण्याचे प्रमाण वाढले होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि ग्रामीण युवकांना प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून रोजगार - प्रशिक्षणाची नवी संधी उपलब्ध करून देण्या साठी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेंन व प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे यांच्या नियोजनानुसार या 'यश कल्पतरू प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र’ ची आखणी करण्यात आली. गत २२ मार्च २०२६ रोजी विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. दतात्रय गुजराथी यांच्या हस्ते आणि कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे केंद्र सुरु करण्यात आले. त्या अंतर्गत नारळाची शास्त्रोक्त पद्धतीने साल काढून ते वाळवले जाते आणि त्या वाळवलेल्या खोबऱ्यापासून आधुनिक तेल काढणी यंत्र ('ऑइल एक्स्ट्रॅक्शन मशीन') द्वारे उच्च दर्जाचे, पूर्ण पणे रसायनमुक्त शुद्ध तेलाची निर्मिती केली जात आहे. या प्रक्रियेत कोणत्याही कृत्रिम संरक्षकाचा (प्रिजर्व्हेटिव्ह्ज) वापर केला जात नाही. नियंत्रित तपमानाच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे नारळाचा मूळ नैसर्गिक स्वाद, सुगंध आणि त्यातील अत्यंत महत्त्वाचे पोषक घटक पूर्णपणे टिकून राहतात. परिणामी, बाजारात मिळणाऱ्या सर्वसामान्य परिष्कृत (रिफाइंड) तेलाच्या तुलनेत हे तेल अत्यंत दर्जेदार, शुद्ध आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात आहे. या प्रकल्पाच्या सुबक संचलनासाठी विद्यापीठाने जैविक घटक निर्मिती प्रयोगशाळेजवळ सर्व आधुनिक सुविधांनी युक्त असे संचित सदन ( कंटेनर हाऊस ) उभारले असून, तेथेच हे तेल काढणी यंत्र बसवण्यात आले आहे. उत्पादित होणारे हे तेल १ लिटर, अर्धा लिटर आणि २०० मिली स्वरुपात आकर्षक वेष्टनासह सुयोग्य बाटल्यांद्वारे व विद्यापीठाच्या विहित नियमांनुसार वाजवी दरात विक्री करण्यात येत आहे. विशेष म्हणजे तेल काढल्यानंतर शिल्लक राहणारा बारीक खोबरे भुगा देखील ग्राहकांसाठी विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे.
शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत या उत्पादनासाठी अन्न व औषध प्रशासना कडून रीतसर ( एफएसएसएआय ) परवाना मिळविण्यात आला आहे. या तेलाची शासनमान्य एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळे तून सखोल तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये अत्यंत उच्च दर्जाचे व बहुगुणी पोषक घटक आढळून आले आहेत. त्यामुळे हे तेल केवळ केसांसाठीच नव्हे, तर खाण्यासाठीसुद्धा अत्यंत उत्तम आणि आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणित झाले आहे. विद्यापीठाने या संपूर्ण प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विषय तज्ज्ञ हेमराज राजपूत यांची नियुक्ती केली आहे. कृषी विज्ञान केंद्राचे माधव माळी संयोजक म्हणून व जयंत भोये सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत, अशी माहिती विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. नितीन ठोके यांनी दिली आहे.
यासंदर्भात कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राच्या या उपक्रमामुळे नारळ उत्पादकांना, ग्रामीण भागातील युवक आणि महिलांना नारळ मूल्यवर्धनाचा फायदा मिळणार आहे. नारळ प्रक्रिया उद्योगाचे विशेष कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेवून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची मोठी प्रेरणा मिळणार आहे. शेतीपूरक व्यवसायातून शाश्वत उत्पन्न आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करून ग्रामीण समृद्धीचे एक नवे दालन या निमित्ताने खुले झाले आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
चौकट
भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९९४ मध्ये मुक्त विद्यापीठ परिसरात कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. शेतकरी, ग्रामीण युवक, महिला आणि कृषी विस्तार अधिकाऱ्यांपर्यंत शेती व शेतीपूरक व्यवसायातील अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहचवून त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा या केंद्राचा मुख्य हेतू आहे. शेतकऱ्यांना एकाच छताखाली आधुनिक शेतीचे विविध प्रयोग पाहता व अभ्यासता यावेत यासाठी केंद्राच्या प्रक्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फळबागा, अत्याधुनिक फळ रोपवाटिका, मधुमक्षिका पालन, मशरूम उत्पादन, गांडूळखत निर्मिती, शेळी पालन आणि कुक्कुट पालन यांसारखे अनेक प्रात्यक्षिक प्रकल्प यशस्वीपणे उभे करण्यात आले आहेत. याशिवाय माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, जैविक घटक उत्पादन प्रयोगशाळा आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये उत्पादन प्रयोगशाळा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सातत्याने विविध सेवा पुरविल्या जात आहेत.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा