Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २ जुलै, २०२६

*एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत मोठा 'पॉवर गेम',केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेनेच्या 'या' 2 खासदारांची नावं फायनल?-- श्रीकांत शिंदे व ओमराजे निंबाळकर यांची दाट शक्यता?*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने जोरदार टीका होत असताना, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 'सायलेंट' ऑपरेशन सुरूच असून कोणताही गाजावाजा न करता ठाकरे गटाला एकामागून एक मोठे हादरे देत आहेत. गेल्या आठवड्यात ठाकरे गटाचे 6 खासदार आपल्या गळाला लावल्यानंतर, शिवसेना शिंदे गटाने विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनाही आपल्या पक्षात खेचून आणले. इतकंच नाही तर सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवडही झाली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे शिंदेंची राजकीय पकड अधिक मजबूत झाली आहे.

एकनाथ शिंदे यांचा दिल्ली पॉवर गेम!

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींदरम्यान दिल्लीतून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांतच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या (शिंदे गट) वाट्याला दोन महत्त्वाची मंत्रिपदे येण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भातील अंतिम चर्चा आणि नाव निश्चितीसाठी एकनाथ शिंदे बुधवारी दुपारीच दिल्लीला रवाना झाल्याचे समजते.

'या' 2 खासदारांची नावं फायनल?

शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी दोन खासदारांची नावे आघाडीवर आहेत. त्यात एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि नुकतेच ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात दाखल झालेले ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे.

एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असलेले श्रीकांत शिंदे हे गेल्या 12 वर्षांपासून खासदार म्हणून कार्यरत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या 'ऑपरेशन टायगर'मध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची आणि पडद्यामागची भूमिका बजावली होती. पक्ष विस्तारासाठी सातत्याने दौरे करणाऱ्या श्रीकांत शिंदे यांच्यावर आता थेट केंद्रीय मंत्रिपदाची मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे.

दुसरीकडे, ठाकरे गटातून फुटून आलेल्या 6 खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा आहे. तळागाळातील कार्यकर्ते आणि जनतेशी थेट नाळ जोडलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. बंडानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्यावर सर्वात जास्त टीका झाली होती, मात्र, ग्राउंडवर उतरून लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या त्यांच्या शैलीमुळे एकनाथ शिंदे ओमराजेंच्या रूपाने एका तरुण चेहऱ्याला मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'एनडीए'मध्ये वाढले एकनाथ शिंदेंचं वजन!

ठाकरे गटाचे 6 खासदार सोबत आल्यामुळे दिल्लीच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांची ताकद कमालीची वाढली आहे

नवे पक्षीय बलाबल :

ठाकरे गटाच्या खासदारांच्या प्रवेशानंतर भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांची संख्या आता 13 वर पोहोचली आहे.या संख्याबळामुळे एनडीएमध्ये भाजप आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पार्टीनंतर (TDP-16 खासदार) आता एकनाथ शिंदेंची शिवसेना हा तिसरा सर्वात मोठा घटक पक्ष ठरला आहे. गेल्या वर्षी सरकार स्थापन झाले तेव्हा शिवसेनेला केवळ एकच मंत्रिपद मिळाले होते, मात्र आता वाढलेल्या संख्याबळामुळे आगामी विस्तारात मित्रपक्षांचा, विशेषतः शिवसेनेचा कोटा वाढणार हे निश्चित मानले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा