Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २२ जुलै, २०२६

विद्या प्रतिष्ठान इंदापूर पॉलिटेक्निकमध्ये 'अजितदादा पवार : एक प्रेरणादायी नेतृत्व' विषयावरील निबंध स्पर्धेत तीन शैक्षणिक संस्थांतील १०० विद्यार्थ्यांचा सहभाग; विजेत्यांचा गौरव*

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

बुधवार,२२ जुलै २०२६

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९


माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे  "अजितदादा पवार : एक प्रेरणादायी नेतृत्व" या विषयावर निबंध लेखन स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान मधील तीन शैक्षणिक संस्थांतील १०० मुलांनी उस्फुर्त सहभाग  नोंदविला. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात सकाळी ९.३० ते ११.०० या वेळेत पार पडलेल्या या स्पर्धेत इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल, विद्या प्रतिष्ठान कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आणि विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज मधील १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

स्पर्धेतील उत्कृष्ट निबंधांची निवड करून विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूलमधून प्रथम क्रमांक मास्टर सतीश पिंटू पाटील, द्वितीय क्रमांक कु. माही लक्ष्मीकांत लाकाळ आणि तृतीय क्रमांक कु. प्राची अनिल बनसोडे यांनी मिळविला तर विद्या प्रतिष्ठान कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमधून प्रथम क्रमांक कु. श्रुष्टी रामचंद्र जामदार, द्वितीय क्रमांक कु. भाग्यश्री तात्यासाहेब ठणके आणि तृतीय क्रमांक कु. प्रगती दिगंबर पवार यांनी यश संपादन केले. विजेत्यांना अनुक्रमे रुपये १,०००, ७०० आणि ५०० रोख पारितोषिकांसह प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाला. 

यावेळी डॉ. सुजय देशपांडे म्हणाले, "विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता वाचन, चिंतन आणि लेखनाची सवय जोपासली पाहिजे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, नेतृत्वगुण, सामाजिक भान आणि प्रभावी अभिव्यक्ती विकसित होते. स्व. अजितदादा पवार यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी जबाबदार, कर्तृत्ववान आणि समाजाभिमुख नागरिक म्हणून घडावे." 

यावेळी प्रा. लक्ष्मीकांत लाकाळ म्हणाले, "स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करताना मन आजही भावूक होते. दादांच्या नावापुढे 'स्व.' हा शब्द लिहावा लागतो आणि त्यांची जयंती साजरी करावी लागते, यावर आजही विश्वास बसत नाही. त्यांच्या कार्याची प्रेरणा, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि समाजासाठी दिलेले योगदान सदैव मार्गदर्शक राहील. अशा उपक्रमांमधून त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे."

स्पर्धेतील निबंधांचे परीक्षण महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापकांनी केले. सर्व विभाग प्रमुखांनी परीक्षक व मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडत विद्यार्थ्यांच्या निबंधांचे विषयज्ञान, आशय, भाषा, मांडणी, सर्जनशीलता आणि विचारांची सुसंगती या निकषांवर मूल्यमापन करून विजेत्यांची निवड केली.

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन प्रा. प्रियांका सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल अतुल चंदनवंदन यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथालय समितीचे सदस्य प्रा. महेश कुलकर्णी, प्रा. रोहिणी गोरे, प्रा. मिहीर वणवे, प्रा. शीतल फडतरे आणि प्रा. गौरी कोळी यांनी यशस्वीरीत्या केले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी  प्रा. मुज्जमिल शेख, प्रा. संतोष देवकते, सर्व विभागप्रमुख, अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रंथालय समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा