*इंदापूर, डॉ. संदेश शहा*
*सोमवार, २० जुलै २६*
*टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*
रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया ही जागतिक पातळीवर आरोग्य प्रदान करणारी संस्था असून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात मोफत आरोग्य सुविधा देण्याचे काम गेली पंचवीस वर्षे करत आहे. सोसायटीचे मोफत आरोग्य सेवेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असून सोसायटीचे निरपेक्ष वृत्तीने काम करण्याचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन ग्रामविकास पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केले.
नामदार जयकुमार गोरे यांनी इंदापूर पालखी स्थळाजवळ असलेल्या रेड स्वस्तिक आरोग्य सेवा केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत रेड स्वस्तिकचे आरोग्य वारी प्रकल्प संचालक संतोष राजगुरू यांनी केले. यावेळी नामदार गोरे यांना रेड स्वस्तिकचा वर्धापन दिनाचा अंक देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
नामदार जयकुमार गोरे पुढे म्हणाले, देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावर जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्याचे कार्य इतरांनी आदर्श घ्यावे असे आहे. रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. टी. एस. भाल, रेड स्वस्तिक चे अखिल भारतीय अध्यक्ष सुरेश कोते, महाव्यवस्थापक अशोक शिंदे, रेड स्वस्तिकचे प्रोजेक्ट डायरेक्टर, वारीचे नेतृत्व करणारे संतोष राजगुरू, पुणे शहराचे सेक्रेटरी जयसिंगराव पवार, माजी डेप्युटी डायरेक्टर डॉ. दत्ता खुणे, विलास गायकवाड, बापू माने, गजानन गोरे, रेखा गोरे, अभिजीत बेलेकर, राजू बेडगे, विजय नेचकर, नितीन उकिरे ही सर्व मंडळी आरोग्य सेवा तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून बजावत आहेत. ते वारकरी सेवेत विठ्ठल भक्ती करत आहेत असे मत नामदार जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी संतोष राजगुरू यांनी रेड स्वस्तिकच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या विविध कार्याची माहिती नामदार गोरे यांना दिली. या पालखी सोहळ्यात आतापर्यंत पंचवीस हजार हून जास्त वारकऱ्यांपर्यंत मोफत तपासणी व औषधोपचार सेवा पुरविण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा