Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३ जुलै, २०२६

*अकलूज पोलिसांची दमदार कारवाई माळशिरस तालुक्यातील विजय वाडी येथील सशस्त्र दरोड्याचा गुन्हा उघड तीन आरोपी जेरबंद १२ ४६,५४६ लाखाचे सोने जप्त*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयवाडी येथे मे २०२६ महिन्यात घडलेल्या अत्यंत धाडसी आणि सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात अकलुज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मोठे यश आले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत दोन मुख्य दरोडेखोरांसह चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या एका सोनाराला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चालू बाजारभावाप्रमाणे तब्बल १२,४६, ५४६ रुपये किमतीचे ८४.७६ ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या सखोल तपासादरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणखी चार सराईत दरोडेखोरांची नावे निष्पन्न झाली असून पोलीस त्यांच्या मागावर आहे






गुन्ह्याची पार्श्वभूमी:

दिनांक १७ मे २०२६ रोजी मध्यरात्री ०१/०० ते ०२/०० वाजण्याच्या सुमारास विजयवाडी (ता. माळशिरस) येथील रहिवासी फिर्यादी प्रदिपसिंह शंकरराव कदम (वय ६८ वर्षे) यांच्या घरात चार अनोळखी शस्त्रधारी दरोडेखोरांनी प्रवेश केला. दरोडेखोरांनी फिर्यादीच्या छातीला गलोल लावून त्यांना, त्यांच्या पत्नी व सासू यांना मारहाण करण्याची भीती दाखवली. त्यानंतर आरोपींनी महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, देवघरातील व कपाटातील रोख रक्कम असा मुद्देमाल जबरदस्तीने चोरुन नेला होता. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०९ (४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम करीत होते.


स्थानिक म्होरक्याच्या मदतीने 'रेकी' वृद्ध दांपत्याला केले लक्ष्यः-

पोलिसांच्या सखोल तपासात समोर आले आहे की, दरोडेखोरांनी स्थानिक गुन्हेगाराच्या मदतीने विजयवाडी येथील या घराची पूर्ण रेकी (पाळत) केली होती. घरात केवळ वृद्ध दांपत्य आणि त्यांची वयोवृद्ध सासू राहतात, जे मध्यरात्रीच्या वेळी कोणताही मोठा प्रतिकार करू शकणार नाहीत, याची पक्की खात्री स्थानिक आरोपीने टोळीला दिली होती. हा दरोडा पूर्णपणे यशस्वी होईल असा अचूक अंदाज बांधूनच अतिशय नियोजनबद्ध रीतीने हा गुन्हा करण्यात आला होता.



पोलिसांचा तपास आणि अचूक कारवाई:-

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा विशेष पोलीस महानिरीक्षक, श्री रंजनकुमार शर्मा साो, मा पोलीस अधीक्षक सोलापुर ग्रामीण, श्री अतुल कुलकर्णी साो, मा अप्पर पोलीस अधीक्षक, श्री विजय कबाडे साो, मा उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज विभाग अकलुज, श्री संतोष वाळके साो, पोलीस निरीक्षक, निरज उबाळे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे सुचना दिल्या. तपास पथकाने विजयवाडी गावच्या आसपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल टॉवर डंप डेटाचे विश्लेषण आणि रेकॉर्डवरील संशयित दरोडेखोरांच्या हालचालींची तांत्रिक पडताळणी केली. या सायबर व तांत्रिक

विश्लेषणातून पोलिसांनी अत्यंत कौशल्याने दरोडेखोरांचा माग काढला 'पोलिसांचे वेषांतर हॉटेलमध्ये वेटर बनून दरोडेखोराला बेड्या!'

सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी दरोडा टाकल्यापासून गायब होता. पोलीस आपल्या पाठीवर असण्याची चाहूल लागल्यामुळे तो अत्यंत सावधगिरी बाळगत पोलिसांना सतत गुंगारा देत होता. दरम्यान, हा आरोपी धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी तात्काळ तिथे पोहोचून सापळा रचला आणि हॉटेलमध्ये थेट वेटर चे वेषांतर करून थांबले. आरोपी हॉटेलमध्ये येताच वेटरच्या वेषातील पोलिसांनी झडप घालून अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले.


पुरावा नष्ट करण्यासाठी सोन्याचे दागिने वितळवून बनवले शिक्के


अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, आरोपी यांनी त्यांचे साथीदारांचे मदतीने दरोडा टाकुन लुटलेले सोने धाराशिव जिल्ह्यातील त्यांचा एक साथीदार असलेला सोनार याच्या मार्फतीने विकल्याची कबुली दिली. तपास पथकाने तात्काळ धाराशिव येथे जाऊन सोनाराला अटक केली. या सोनाराने गुन्ह्याचा कोणताही पुरावा शिल्लक राहु नये म्हणून ते दागिने तात्काळ वितळवले आणि त्याचे सोन्याचे शिक्के तयार करून पुढे दुसरे सोनाराला विकले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून वितळवलेले ८४.७६ ग्रॅम सोने जप्त केले असून, त्याची चालू बाजारभावाप्रमाणे किंमत १२,४७,५४६ रुपये आहे.

गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपीः-

१) आशिष बप्पा काळे रा डिकसळ ता कळंब जि धाराशिव

२) प्रकाश कैलास भगवे रा विजयवाडी ता माळशिरस

) निलेश महादेव चव्हाण रा कळंब, जि धाराशिव (गुन्हयातील साथीदार सोनार)

३ आणखी चार सराईत गुन्हेगार निष्पन्नः-

या गुन्ह्याच्या तपासात टोळीतील आणखी चार मुख्य आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. हे चारही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर वेगवेगळ्‌या जिल्ह्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

कामगिरी करणारे पथकः-

सदरची कौतुकास्पद कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (अकलूज) श्री. संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सपोनि विक्रम साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोहेकॉ सुहास क्षिरसागर, विक्रम घाडगे, शिवकुमार मदभावी, विनोद साठे, दत्ता खरात, सोमनाथ माने, पंडित गवळे, तुकाराम माने देशमुख आणि सायबर शाखेचे प्रवीण मेटकरी यांच्या पथकाने यशस्वीपणे बजावली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम हे करीत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा