*उपसंपादक नुरजहां शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळीनगर, ता. : येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल झाला असून कारखान्याच्या चेअरमनपदी मोहन लांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. व्हाईस चेअरमनपदी विशाल जाधव, तर होलटाईम डायरेक्टरपदी निखिल कुदळे यांची निवड झाल्याने कारखान्यात नव्या नेतृत्वाच्या पर्वाला प्रारंभ झाला आहे.
ब्रिटिश राजवटीत सन १९३२ मध्ये स्थापन झालेल्या या ऐतिहासिक खाजगी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मंगळवारी (ता. ७) झालेल्या बैठकीत या निवडी पार पडल्या. माजी चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या चेअरमनपदाची धुरा आता मोहन लांडे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली असून त्यांची तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे ते दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचेही पदसिद्ध चेअरमन झाले आहेत.
मोहन लांडे हे २०१४ पासून कारखान्याच्या संचालक मंडळावर कार्यरत असून शांत, अभ्यासू आणि समन्वयवादी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
विशाल जाधव हे २०१६ पासून संचालक असून त्यांना दोन वर्षांसाठी व्हाईस चेअरमनपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. निखिल कुदळे हे २०२१ पासून संचालक मंडळावर कार्यरत असून यापूर्वी त्यांनी व्हाईस चेअरमन म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या अनुभवाची दखल घेत त्यांची होलटाईम डायरेक्टरपदी निवड करण्यात आली.
यावेळी माजी चेअरमन राजेंद्र गिरमे, मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके तसेच संचालक नंदकुमार गिरमे, परेश राऊत, यश बोरावके, राहुल गिरमे, अशोक गिरमे, सतीश गिरमे आणि निळकंठ भोंगळे उपस्थित होते.
विशेष म्हणजे, राजेंद्र गिरमे यांनी जवळपास चार दशकांहून अधिक काळ संचालक मंडळावर विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यापैकी सुमारे २५ वर्षे त्यांनी चेअरमन, व्हाईस चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर आणि होलटाईम डायरेक्टर अशा महत्त्वाच्या पदांवर काम पाहिले. त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळानंतर आता मोहन लांडे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या विकासाला नवी दिशा आणि नवी गती मिळेल, अशी अपेक्षा सभासद व ऊस उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा