Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २ जुलै, २०२६

इंदापूर नगरपरिषद प्रांगणात भरदिवसा विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर ४ हल्लेखोरांनी केला जीवघेणा हल्ला, मित्राच्या धाडसाने वाचले प्राण, शनिवारी ४ जुलै रोजी शहर बंदची हाक.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

गुरुवार, २ जुलै २६

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९



इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा आपले मेंबर ग्रूपचे अध्यक्ष अनिल उर्फ अण्णा पवार यांच्यावर गुरुवारी दि.२ जुलै रोजी भरदिवसा नगरपरिषद कार्यालयासमोर मैदानात चार अज्ञात हल्लेखोरांनी कोयता व चॉपरसारख्या धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पवार थोडक्यात बचावले असून त्यांच्या डाव्या दंडाला व पाठीवर किरकोळ जखम झाली आहे. त्यांना वाचवण्यासाठी धावून गेलेले मित्र वसीम शेख हे देखील जखमी झाले आहेत. दिवसा ढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.


गुरुवारी नगरपरिषदेत एसआरएस संदर्भातील बैठक मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठक संपल्यानंतर श्री. पवार हे नगरसेवक सुधाकर ढगे यांच्या सोबत तहसील कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडले. नगरपरिषदे समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्या जवळ पवार दुचाकीवर बसत असतानाच तोंडाला रुमाल व मास्क बांधलेले चार अनोळखी इसम आले.

एकाने पवार यांच्या कानशिलात चापट मारताच त्यांनी समोरच्या कपड्यांच्या दुकानातील मित्र वसीम शेख यांना हाक मारली. त्याचवेळी हल्लेखोरांनी कपड्यांत लपवलेले कोयते बाहेर काढले. वसीम शेख धावून आल्याने दोन हल्लेखोर त्यांच्याकडे वळले, तर दोघांनी पवार यांचा पाठलाग केला. जीव वाचविण्यासाठी पवार नगरपरिषद कार्यालयाकडे पळत असताना एका हल्लेखोराने डोक्यावर कोयत्याने वार केला. मात्र पवार यांनी प्रसंगावधान राखून वार चुकविल्याने तो डाव्या दंडाजवळ व पाठीवर किरकोळ लागला. वसीम शेख यांच्या पायाच्या अंगठ्याजवळ जखम झाली. गोंधळामुळे नागरिक जमू लागताच हल्लेखोर नगरपरिषदेच्या पाठीमागे उभ्या चारचाकी वाहनातून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. हल्लेखोरांना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी व्यक्त केला.

जखमी पवार यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना नगराध्यक्ष भरत शहा यांनी नगरसेवकांसह  रुग्णालयात धाव घेत पवार यांची भेट घेऊन विचारपूस केली. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर यांनी देखील पवार यांची  भेट घेऊन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला.

 यासंदर्भात अनिल पवार म्हणाले, मी या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. आपण या हल्ल्यातून वाचलो असून, पोलीसांनी हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करावी.

दरम्यान या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शनिवारी दि.४ जुलै रोजी इंदापूर बंद व रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे. शहर व तालुक्यातील सर्व नागरिक, सामाजिक व धार्मिक संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तानाजी धोत्रे, ॲड. चौगुले व सहकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक विलास नाळे यांना निवेदन देवून हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली.

दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा