उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील लवंग,गणेशगाव,तांबवे,वाघोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गणेशगावातील शेतकऱ्यांचे पशुधन या जुलै महिन्यात चार वेळा चोरीस गेले आहे.आठवड्यातून एकदा एका गावात शेतकऱ्यांच्या शेळ्या ,गाई चोरी होत आहे, लवंग गावातील विद्युत पंपांच्या व केबल चोरीचे ही प्रमाण वाढले आहे व केळी पिकाचे जाणीवपूर्वक नुकसान करण्याच्या घटना सातत्याने घडत असून अशा या
घटनांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. दिवस-रात्र कष्ट करून उभे केलेले पीक आणि मालमत्ता सुरक्षित राहील की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अनेक शेतकऱ्यांना रात्री शेतातच मुक्काम करून राखण करण्याची वेळ आली आहे.
चोरीच्या वाढत्या घटनांवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी लवंग व गणेशगाव परिसरात नियमित आणि प्रभावी पोलिस गस्त सुरू करावी, प्रमुख चौक, रस्ते आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच चोरी करणाऱ्या टोळ्यांचा तातडीने बंदोबस्त करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी करीत आहेत.
शेतकऱ्यांच्या कष्टाचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा संपूर्ण परिसरातून व्यक्त होत आहे.
लवंग,गणेशगाव,वाघोली,तांबवे परिसरात पोलिस गस्त वाढविण्याची त्रस्त शेतकऱ्यांची मागणी जोर धरत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा