लेखकः- श्री.संदीप शिंदे, केंद्रिय अध्यक्ष, मो.नं.९९२२२३७२२२
महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना,
इंदापूर येथे एस.टी.कामगारांच्या आयुष्यामध्ये दिपस्तंभ ठरावे असे गेली ५० वर्षे एस.टी.कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवून संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देणारे यशस्वी नेतृत्व व कर्तृत्व असलेले हनुमंत ताटे यांचा गौरव सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला असून त्यांच्या समर्पित कामगार सेवेचा घेतलेला दीपस्तंभ आढावा
एखाद्या सामान्य कुटुंबातील तरुणाने सरकारी महामंडळात साधी कारकुनाची नोकरी स्वीकारावी आणि पुढे जाऊन आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रातील एका बलाढ्य कामगार संघटनेच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारावी, हा प्रवास थक्क करणारा आहे. हा प्रवास आहे महाराष्ट्र राज्य एस.टी कामगार संघटनेचे खंबीर नेते हनुमंत ताटे यांचा. केवळ एक व्यक्ती म्हणून नव्हे, तर कामगार चळवळीतील एक 'विचार' म्हणून श्री. ताटेसाहेब यांच्याकडे पाहिले जाते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी अनेकांनी लढे दिले, परंतु काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांचे संपूर्ण आयुष्यच कामगार चळवळीसाठी समर्पित असते. अशा नेतृत्वाचा प्रभाव केवळ संघटनेपुरता मर्यादित राहत नाही, तर हजारो कर्मचाऱ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरतो.
कामगारांचे प्रश्न समजून घेणे, त्यांच्या अडचणी शासन आणि प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि त्यासाठी सातत्याने संघर्ष करणे ही प्रत्येकाची क्षमता नसते. त्यासाठी निष्ठा, धैर्य, अभ्यास आणि प्रामाणिकपणा या चारही गोष्टींची नितांत आवश्यकता असते. अशा गुणांवर उभे राहिलेले श्री. ताटे साहेबांसारखे नेतृत्वच दीर्घकाळ कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करू शकते.
सामान्य सुरुवात ते 'लालपरी'शी घट्ट नाते असलेले हनुमंत ताटे यांचा जन्म इंदापूर तालुक्यातील डाळज येथील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात लिपिक म्हणून रुजू झाल्यानंतर, त्यांच्यातील संवेदनशील मनाला कामगारांचे प्रश्न जवळून अनुभवता आले. पुणे-सोलापूर महामार्गावर कधीही लालपरीचा अपघात झाला, तर रात्री अपरात्री कामगारांच्या मदतीला धावून जाणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणजे हनुमंत ताटे. अगदी कामगारांच्या गणवेशाचे कापड स्वतःच्या पाठीवर वाहून नेण्यापासून ते त्यांच्या सुख-दुःखात सामील होण्यापर्यंतच्या त्यांच्या तत्परतेमुळे कामगारांनी त्यांना प्रेमाने 'डेपो सेक्रेटरी' बनवले. येथूनच त्यांच्या खऱ्या नेतृत्वगुणांची पायाभरणी झाली.
भाऊ फाटक यांचा वारसा आणि नेतृत्वाची झेप त्यांनी घेतली.
त्या काळात समाजवादी विचारांचे ज्येष्ठ नेते भाऊ फाटक हे एसटी कामगारांचे नेतृत्व करत होते. ताटे यांच्यातील प्रामाणिकपणा आणि कामाची तळमळ ओळखून भाऊ फाटक यांनी त्यांच्यावर प्रादेशिक सचिवाची जबाबदारी सोपवली. पुढे भाऊ फाटक यांच्या आजारपणात संघटनेची धुरा श्री. ताटे साहेब यांच्याकडे आली. श्री.ताटे साहेब यांनी हा विश्वास सार्थ ठरवत, अत्यंत कमी कालावधीत संपूर्ण राज्यभरातील कामगारांना एकत्र बांधले आणि संघटनेला एक नवी उंची मिळवून दिली. त्यांच्या नेतृत्वाचा परीघ केवळ एसटीपुरता मर्यादित राहिला नाही. हिंद मजदूर सभेच्या राज्य अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी रेल्वे, मुंबई बंदरे, एअर इंडिया, संरक्षण, साखर, कापड, माथाडी आणि अंगणवाडी अशा विविध क्षेत्रांतील सुमारे १० ते ११ लाख कामगारांचे यशस्वी नेतृत्व केले.
चळवळीसमोरील आव्हाने आणि 'फिनिक्स' भरारी
गेल्या काही वर्षांत परिवहन क्षेत्रात खाजगीकरणाचा प्रभाव वाढला आहे. कनिष्ठ वेतनश्रेणीतील भरती, महामंडळाच्या निर्णयप्रक्रियेत सरकारी हस्तक्षेप आणि खाजगी गाड्यांचा वाढता वापर यांमुळे एसटी कामगारांच्या चळवळी समोर मोठी संकटे उभी राहिली. अनेक निर्णय चळवळ मोडीत काढणारे ठरले. मात्र, अशा कठीण परिस्थितीत देखील खचून न जाता हनुमंत ताटे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली संघटनेने 'फिनिक्स' पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा गरुडभरारी घेतली आणि कामगारांचे हक्क अबाधित राखले.
निर्भीड आणि स्वतंत्र विचारसरणी हे
ताटे यांच्या नेतृत्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. त्यांनी संघटनेची वीण कधीही विस्कटू दिली नाही. संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न न ठेवता, "जो कामगारांना मदत करेल, त्याला आम्ही मदत करू" हे स्वतंत्र आणि बाणेदार धोरण त्यांनी कायम ठेवले. यासोबतच नवीन कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वगुण रुजवून त्यांना संघटनेच्या प्रवाहात आणण्याचे मोठे काम त्यांनी केले. माझ्यासारख्या कायर्शाळेत काम करणा-या एका सर्वसामान्य कुटूंबातील सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये देखील नेतृत्व गुण भरून त्याला केंद्रिय अध्यक्ष पदापर्यंत बोटाला धरून दिशा देण्याचे कामदेखील ताटे आबांनी केले.
निष्कर्ष आणि भविष्याची दिशा असलेल्या आजच्या डिजिटल युगात तरुण पिढीची मानसिकता बदलत आहे. ध्येय धोरणांपेक्षा केवळ आर्थिक गणितांना महत्त्व देण्याच्या या काळात श्री. ताटे साहेब यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची नितांत गरज आहे. तब्बल ५० वर्षे कामगार चळवळीत संघर्ष करणाऱ्या या योद्ध्याचा भूतकाळातील अनुभव हा नव्या पिढीसाठी दिशादर्शक ठरणार आहे. गेल्या काही कालावधीत चळवळीची व्याख्याच बदलविण्याचे काम काही विघातक मंडळींनी केले. चळवळीत राजकारण आणून एस.टी. कामगारांना भरकटवून कामगारांचे आणि उद्योगाचे मोठे नुकसान झाले. परंतु यातुनही श्री.ताटे साहेबांनी चळवळीला वेगळी दिशा देत सर्वांची मोट एकत्रित बांधून आंदोलन उभे करून मूळ वेतनात ६५००/- रूपयांची वाढ व त्याची थकबाकी मिळवून दिली. काही दिवसापुर्वीच पुन्हा एकदा कृती समिती तयार करून शासनावरती आंदोलनाचा दबाव वाढवून कामगारांची प्रलंबित आर्थिक देणी मिळवून देण्यास त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या अभिष्ठचिंतना निमित्त होणारा गौरव सोहळा हा केवळ एक सत्कार नसून, येणाऱ्या पिढ्यांसाठी कामगार चळवळ जिवंत ठेवण्याची प्रेरणा देणारा एक ऊर्जास्रोत ठरेल यात शंका नाही. योगायोगाने याच दिवशी गुरूपौर्णिमेचा शुभ दिवस येत असल्याने या दिवशी रा.प.कर्मचा-यांचे वेतन राज्य सरकारएवढे करण्याचा संकल्प आणि बिगूल वाजविण्याची नामी संधी या सोहळ्यात निश्चितच आहे. हे नेतृत्व शतायुषी व्हावे व सुर्याप्रमाणे तळपत रहावे याच सदिच्छा ..... !
लेखकः- श्री.संदीप शिंदे, केंद्रिय अध्यक्ष, मो.नं.९९२२२३७२२२
महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना,






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा